सोलापूर मनपाच्या भाजप नगरसेवकांमध्ये धुसफूस सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत, तशा भाजपच्या नगरसेवकांमधील नाराजी व धुसफूस वाढत चालली आहे. सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी रस्त्याच्या कामासाठी व्यापाऱयांना घेऊन आंदोलन केले, तर पालिका सभेतील विद्यमान सभागृह नेत्याला बाजूला सारत नाराजी दूर करण्यासाठी नागेश भोगडे या माजी पालकमंत्र्यांच्या निकटवर्तीयाला हंगामी सभागृह नेतेपद देण्यात आले आहे. यामुळे भाजपातील गटबाजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडत आहे.

महापालिकेच्या ‘अमृत योजनें’तर्गत शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱया कुंभारवेस परिसरातील रस्ता गेल्या दीड वर्षापासून खोदून ठेवण्यात आला आहे. ड्रेनेज लाइन व पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ता खोदल्याचे कारण देण्यात येत आहे. परंतु, बाजारपेठेतील रस्ता लवकर पूर्ण न करता रेंगाळत ठेवण्यात आल्याने गेल्या 4 महिन्यांपासून व्यापारी व नागरिकांनी वारंवार निवेदन देऊन रस्ता पूर्ण करण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. अद्यापि हा रस्ता पूर्ण न झाल्याने वाहतूक बंद असून, यामुळे व्यापाऱयांमध्ये तीक्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी व्यापारी व नागरिकांना घेऊन भररस्त्यात आंदोलन केले. यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दुसरीकडे महापालिकेच्या सभागृह नेतेपदावरून भाजपच्या नगरसेवकांमध्येच दुफळी पडली आहे. विद्यमान सभागृह नेता शिवानंद पाटील यांना पक्षातून तीक्र विरोध सुरू झाला आहे.

शहरात माजी पालकमंत्री आमदार विजय देशमुख विविध कामांचे उद्घाटन कार्यक्रम घेत आहेत. यादरम्यान बंडाळी होऊ नये म्हणून शिवानंद पाटील यांच्याऐवजी माजी पालकमंत्री देशमुख यांचे निकटवर्तीय ओळखले जाणारे नागेश भोगडे यांना हंगामी सभागृह नेता करण्यात आले आहे. यामुळे सत्ताधारी नगरसेवकांमध्ये आणखी नाराजी वाढल्याची चर्चा सुरू आहे.