
सामना ऑनलाईन,नागपूर
नोकऱ्या देताना भूमिपुत्रांनाच प्राधान्य मिळाले पाहिजे, असे सांगतानाच यासाठी गरज भासली तर कायदासुद्धा केला जाईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे जाहीर केले. ते इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) कॅम्पसच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते.
मिहान म्हणजे मल्टी मोडल इंटरनॅशनल हब एअरपोर्टमध्ये स्थानिक तरुणांनाच नोकऱ्या देण्यात याव्यात असा आग्रह धरून गडकरी म्हणाले की, मुंबईनजीकच्या ‘जेएनपीटी’च्या विकासातून किमान 1 लाख 25 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यातील 80 टक्के नोकऱ्या कोकण किनारपट्टीतील स्थानिकांनाच द्याव्यात, असे निर्देश आपण दिले आहेत.



























































