
वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ या कादंबरीने 1974 साली मराठी भाषेला पहिले ‘ज्ञानपीठ’ मिळवून दिले. त्या घटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या 1 व 2 मार्च रोजी आयोजित मुंबईच्या ‘गेटवे लिटफेस्ट’मध्ये एक विशेष सत्र होणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱया दिवशी म्हणजे 2 मार्च रोजी ‘ययातीचा अमीट प्रभाव’ या विषयाला धरून या कादंबरीवर चर्चासत्र रंगणार आहे. यामध्ये 2022 सालच्या ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते दामोदर मौझो व लेखक -अनुवादक प्रा. सचिन केतकर हे सहभागी होतील.
कार्यक्रमाविषयी दामोदर मौझो म्हणाले, ‘ययाती’च्या 1974 च्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गेटवे लिटफेस्ट अशा कार्यक्रमाचे आयोजन करत आहे याचा मला खूप आनंद होत आहे. या पुरस्काराचा महत्त्वाचा पैलू म्हणजे ज्ञानपीठ समितीने प्रथम वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ कादंबरीला हा पुरस्कार दिला आणि नंतर त्यांच्या सर्व साहित्यिक योगदानासाठी हा पुरस्कार दिला. अशा प्रकारे, लेखक आणि त्यांच्या संपूर्ण कार्याचा गौरव केला गेला.’

























































