
कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दहावीची बोर्ड परीक्षा राज्य सरकारने रद्द केली होती. शिक्षण विभागाने दहावीचा निकाल कसा तयार करायचा याचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. त्यानुसार नववी आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केली.
दहावीच्या निकालासाठी 100 टक्के गुणांपैकी 50 टक्के गुणांचे वेटेज दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर 50 टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. दहावीत अंतर्गत मूल्यमापनासाठी 30 गुण, प्रात्यक्षिकसाठी 20 गुण आणि नववीत मिळवलेल्या गुणांसाठी 50 गुणांचे वेटेज अशा पद्धतीने मूल्यमापन करून दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांशी यासंबंधी तब्बल 24 बैठका घेतल्यानंतर दहावीच्या मूल्यांकनाबाबतची पद्धती तयार करण्यात आली आहे. नववीतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोविड स्थितीत वस्तुनिष्ठ पद्धतीने झाले होते. त्याची नोंद सरल प्रणालीत करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे. असे देखील शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
दहावीचा निकाल असा लागणार
दहावीचा निकालाचे सूत्र शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले आहे या सूत्रानुसार इयत्ता नववी व दहावी या दोन्ही इयत्तांमध्ये शाळांनी घेतलेल्या परीक्षांचे गुणांचे रूपांतर शंभर गुणांमध्ये करून अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे 30 गुण
विद्यार्थ्यांचे इयत्ता 10वीचे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यवक्षक परीक्षा यांच्या आधारे 20 गुण
विद्यार्थ्यांच्या इयत्ता नववीच्या अंतिम निकालात मिळालेल्या गुणांचे 50 टक्के वेटेज
वरीलप्रमाणे विषयनिहाय एकूण 100 गुणांपैकी मूल्यांकन होणार
म्हणजेच प्रत्येक विषयातील 100 गुणांपैकी नववीतील गुणांचे 50 टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे 50 टक्के वेटेज वापरून अंतिम निकाल होणार आहे.
शाळांमध्ये निकालासाठी समिती
शाळा स्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावीर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांद्वारे केली जाईल. शाळास्तरावर गैरप्रकार किंवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात येईल.
अकरावीसाठी ऐच्छिक सीईटी
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.शंभर गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न व ओएमआर पद्धतीने दोन तासाची परीक्षा घेण्यात येईल. अकरावी प्रवेश परीक्षा राबवितांना सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेला जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुले असतील व त्या जागांवर सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.
नववीत अनुत्तीर्ण विदयार्थ्यांचे मूल्यमापन
नववीत अनुत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी फॉर्म नंबर 17 भरून खासगीरित्या दहावीच्या परीक्षेला बसले आहेत, त्यांचेदेखील मूल्यमापन निश्चित करण्यात आले आहे. श्रेणीसुधार योजने अंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी कायम राहणार आहे. राज्यातील इयत्ता दहावी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
दहावी निकालाचा फॉर्म्युला
प्रत्येक विषयांचं 100 गुणांचं मूल्यमापन होणार
नववीच्या गुणाचे 50 टक्के गुण ग्राह्य धरणार
मूल्यमापनावर आक्षेप असल्यास कोरोनानंतर परीक्षा
लेखी मूल्यमापनासाठी 30 गुण, प्रात्यक्षिक मूल्यमापनासाठी 20 गुण
प्रत्येक विषयासाठी 100 गुणांचं मूल्यमापन
जून महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर करणार































































