दहावीचा पेपर पुढे ढकलला, भूगोलाच्या परीक्षेची घोषणा 31 मार्चनंतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

23 मार्च रोजी होणारा दहावीचा शेवटचा पेपर अखेर पुढे ढकलण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी ही घोषणा केली. सोमवार, 23 मार्च रोजी दहावीची परीक्षा संपणार होती. भूगोल विषयाची एकच परीक्षा होणे शिल्लक होते. मात्र राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून दहावीची परीक्षाही स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

स्थगित करण्यात आलेली भूगोलाची परीक्षा कोणत्या दिवशी होणार याबाबतची घोषणा 31 मार्चनंतर करण्यात येईल, असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. भूगोल विषयाची परीक्षा सोमवारी सकाळच्या सत्रात होणार होती. सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत पेपर होणार होता, मात्र किद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी शिक्षणमंत्र्यांनी शनिवारी परीक्षा स्थगित केल्याचा निर्णय जाहीर केला.

बोर्डाच्या या परीक्षाही रद्द
भूगोल विषयाच्या परीक्षेप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली कार्यशिक्षण विषयाची परीक्षा तसेच आऊट ऑफ टर्नच्या सर्व परीक्षांना स्थगिती देण्यात आली आहे. या सर्व परीक्षांचे सुधारित वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने विद्यार्थी-पालकांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

मॉडरेटर्सची सभाही होणार नाही
दहावीच्या इतिहास विषयाच्या मॉडरेटर्सची सोमवारी (23 मार्च) होणारी सभादेखील शिक्षण मंडळाने रद्द केली आहे. या सभेची सुधारित वेळ नंतर कळविण्यात येईल, असे मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव संदीप संगवे यांनी स्पष्ट केले आहे.