एसटीचे अधिकारी मालामाल! मूळ वेतनात अडीच ते तीनपट वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गावखेडय़ापर्यंत एसटी पोहोचवणारे चालक-वाहक तुटपुंज्या वेतनावर राबत असले तरी आता अधिकारी मात्र मालामाल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महामंडळाने अधिकाऱ्यांच्या मूळ वेतनात अडीच ते तीनपट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांचे पगार आता दीड-दोन लाखांच्या पुढे जाणार आहेत.

एसटीमध्ये जवळपास 90 हजार कर्मचारी कार्यरत असून त्यांना वेतनवाढ, महागाई भत्ता मिळावा म्हणून रोज उपोषण, आंदोलन करावे लागते. मात्र अधिकाऱयांना घसघशीत पगारवाढ देत महामंडळाने खूश केले आहे. 2008 च्या मूळ वेतनाचा विचार करता अधिकाऱयांच्या मूळ वेतनात अडीच ते तीनपट वाढ झाली असून ती 2016 पासून लागू होणार आहे. याचा लाभ आगार व्यवस्थापक ते महाव्यवस्थापक पदापर्यंत कार्यरत असलेल्या 375 अधिकाऱयांना मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या एसटीच्या डोक्यावर महिन्याला साडेचार कोटी रुपयांचा भार पडणार आहे. दरम्यान, एसटीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना 2016 पासून कोणतीही वेतनवाढ करण्यात आली नव्हती.

असे वाढणार मूळ वेतन
वर्ग-2 अधिकारी (कनिष्ठ) – सध्याचे मूळ वेतन 12,790- 31,503 एवढे असून ते आता 34,630-81,606 होणार आहे

वर्ग -2 अधिकारी (वरिष्ठ) सध्याचे मूळ वेतन 14,480- 36,141 असून ते आता 39,730- 93,628 होईल.

वर्ग -1 अधिकारी- सध्या मूळ वेतन 17,400- 42,256 असून ते 46,450- 1,09,485 होईल.

वर्ग -1 (निवड श्रेणी) मूळ वेतन 20,880- 43,737 असून ते आता 45,750- 1,31,381 होईल.

उपमहाव्यवस्थापक- मूळ वेतन 24,890- 44,966 असून ते आता 66,456- 1,56,613 होईल.

महाव्यवस्थापक- मूळ वेतन 26,280- 47,478 असून ते आता 70,168- 1,65,353 होईल.

महाव्यवस्थापक (निवड श्रेणी) – सध्या मूळ वेतन 28,450-51,559 असून ते आता 76,168-1,79,576 एवढे होणार आहे.