शिखर शिंगणापूर यात्रेसाठी ‘लालपरी’ धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेसाठी सातारा एसटी विभागामार्फत जादा एसटी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. सातारा विभागातील 11 आगारांमार्फत शिंगणापूर यात्रेसाठी 80 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शिंगणापूर यात्रेसाठी लालपरी धावणार आहे.

शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. शिंगणापूर यात्रेसाठी मराठवाडा, विदर्भ, खान्देशातून येणाऱया भाविकांची संख्या मोठी असते. पंढरपूरमार्गे शिंगणापूरकडे येणारे लाखो भाविक एसटीने येत असतात. त्यामुळे शिंगणापूर यात्रेसाठी भाविकांच्या सोयीसाठी दरवर्षी सातारा विभागामार्फत जादा एसटी वाहतुकीची सोय केली जाते. याशिवाय सोलापूर, सांगली, पुणेसह मराठवाडा विभागातूनही जादा बसेस सोडण्यात येतात. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर असल्याने शिंगणापूर यात्रेसाठी येणाऱया भाविकांना एसटी संपाचा फटका बसणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

परंतु, एसटीचे काही कर्मचारी कामावर हजर झाल्याने सातारा विभागाने शिंगणापूर यात्रेसाठी जादा एसटी वाहतुकीचे नियोजन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील 11 आगारांना शिंगणापूर यात्रेसाठी 11 ते 13 एप्रिल कालावधीत जादा एसटी बसेस सोडण्याचे आदेश सातारा विभाग नियंत्रकांनी दिले आहेत. शिंगणापूर यात्रेसाठी यात्राप्रमुख म्हणून दहीवडीचे आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, दहीवडी 15, फलटण 16, वडूज 10, कराड 6, सातारा 6, कोरेगाव 5, वाई 5, महाबळेश्वर 6, मेढा 4, पारगाव – खंडाळा 4, पाटण 3 याप्रमाणे बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. शिंगणापूर यात्रेतील दि. 11 ते 13 एप्रिल या मुख्य कालावधीत शिंगणापूर-पंढरपूर-शिंगणापूर मार्गावर जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.