महिला दिग्दर्शकाचा पाठलाग; एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

महिला दिग्दर्शकाचा पाठलाग करणाऱ्याला मंगळवारी अंबोली पोलिसांनी अटक केली. सुधीर राजेंद्र सिंग असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुधीर हा टॅक्सी सेवा पुरवणाऱया खासगी कंपनीमध्ये काम करत होता. गेल्या वर्षी तो नोकरी मागण्याकरिता महिलेकडे गेला होता. तेव्हापासून तो तक्रारदाराच्या सतत मागे येत असायचा.

सुरुवातीला त्याकडे तक्रारदारांनी दुर्लक्ष केले. काही दिवसांपूर्वी त्या जुहू येथील मंदिरात गेल्या होत्या. तेव्हाही सुधीर हा त्यांना भेटण्याकरिता प्रयत्न करत होता. तेव्हा तक्रारदाराच्या सुरक्षा रक्षकाने त्याला अडवले होते. सुरुवातीला त्याकडे तक्रारदारांनी दुर्लक्ष केले, पण सतत पाठलाग करणे सुरूच असल्यामुळे त्या त्रस्त झाल्या होत्या. अखेर त्यांनी अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सुधीरला अंधेरीच्या वीरा देसाई रोड येथून ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.