अटकेतील आरोपीचे अपघाती मृत्यू प्रकरण, राज्य उत्पादन शुल्क विभाग सीआयडीच्या रडारवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बनावट ताडीविक्रीच्या गुन्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभाग सीआयडीच्या रडारवर आले आहे. घटनेनंतर सीआयडीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एका पथकाने दुसऱ्याच दिवशी (बुधवारी) घटनास्थळाची पाहणी केली असून, त्या संदर्भात एक अहवाल नाशिक येथे पोलीस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाला पाठविला आहे. हा अहवाल आता नाशिकमार्पâत राज्य गुन्हे अन्वेषणच्या (सीआयडी) मुंबई येथील अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठविण्यात आला आहे. त्यांच्या आदेशानंतरच पुढील भूमिका निश्चित होणार आहे.

बनावट ताडीविक्रीप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभागातील कर्मचाऱ्यांनी गेल्या 2 ऑगस्ट रोजी जनार्दन चंद्रयान बंडीवार (रा. राहाता, जि. नगर) याच्यासह दोघांना अटक केली होती. या दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली होती. आरोपीला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यासाठी कोठडीतून काढून घेऊन गेले होते. बाभळेश्वर येथे आरोपीला लघुशंकेसाठी घेऊन जात असताना बंडीवार हा ट्रेलरखाली येऊन त्याचा 3 ऑगस्ट रोजी अपघाती मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर नगरच्या सीआयडी विभागाने बाभळेश्वर येथील घटनेचा आढावा घेतला आहे. त्यानुसार त्याचा एक अहवाल हा नाशिक येथे पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी वरिष्ठ स्तरावर अर्थात अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) यांना पाठविण्यात आला असून, त्याच्या मार्गदर्शक सूचनांकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

लोणी पोलिसांचाही स्वतंत्र तपास सुरू

बंडीवार याच्या अपघातप्रकरणी लोणी पोलिसांचा एक स्वतंत्र तपास सुरू आहे. आरोपी बंडीवार याला न्यायालयात हजर करायचे होते, तर त्याच्या बाबतीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाNयांचाही निष्काळजीपणा पुढे येत आहे. त्यामुळे लोणी पोलिसांच्या तपासात आणखी काय काय गोष्टी निष्पन्न होतात, याकडेही लक्ष लागले आहे.

कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार

– या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मयत बंडीवार यांचा मृतदेह पुण्याला उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. 4 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान मृतदेह पुण्याहून लोणी पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आला. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता. जनार्दन बंडीवार यांच्या नातेवाईक आणि मित्रांनी लोणी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. जोपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल करून कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका बंडीवार यांचे नातेवाईक व मित्रांनी घेतली होती. या प्रकरणात स्वत: न्यायाधीशांनी पंचनामा केला असून, योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले.

पहिलीच घटना

– पोलिसांच्या ताब्यात असताना आरोपीचा मृत्यू झाल्यास त्याचा तत्काळ तपास हा सीआयडीकडे वर्ग होतो; परंतु राज्य उत्पादन शुल्क हे स्वतंत्र खाते आहे. त्यांच्या ताब्यात आरोपी असताना मृत्यू होण्याची ही नगरच्या इतिहासातील प्रथमच घटना आहे. त्यामुळे संबंधित गुन्ह्याचा तपास हा सीआयडीकडे घेण्यासंदर्भात अतिरिक्त पोलीस महासंचालकांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. त्या संदर्भात कागदोपत्रीही व्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्या आदेशानंतरच नगरच्या सीआयडीची भूमिका निश्चित होणार आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सीआयडी आणि राज्य मानवी हक्क आयोगाकडेही लक्ष लागले आहे.