
राष्ट्रीय पथविक्रेता व उपजीविका संरक्षण अधिनियम 2014 तरतुदीनुसार हॉकर्स झोन व नो हॉकर्स झोन निर्माण करावेत व महानगरपालिका पथविक्रेता समितीने केलेल्या ठरावाप्रमाणे बाजारपेठेत पथविक्रेत्यांना चार बाय चार फुटाची जागा महापालिकेने आखून देण्याच्या मागणीसाठी हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (दि.11 ऑक्टोबर) बाजारपेठेतील पथविक्रेत्यांनी महापालिकेत निदर्शने केली. ही मागणी पूर्ण होईपर्यंत हॉकर्सवरील नियोजित अतिक्रमण कारवाई थांबविण्याची मागणी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
नगर महापालिका हद्दीतील पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण झालेले आहे. मात्र, राष्ट्रीय पथविक्रेता व उपजीविका संरक्षण अधिनियम 2014 तरतुदीनुसार जोपर्यंत हॉकर्स झोन व नो हॉकर्स झोन निर्माण होत नाही, तोपर्यंत पथविक्रेत्यांवर कारवाई करता येत नसल्याचे नमूद आहे. महानगरपालिका पथविक्रेता समितीच्या 2 मे 2022 ला झालेल्या बैठकीत समितीने ठराव करून कापड बजार, मोची गल्ली व घास गल्ली येथील पथविक्रेत्यांना चार बाय चार फुटाची जागा महापालिकेने आखून देण्याचा ठराव केलेला आहे. राष्ट्रीय पथविक्रेता व उपजीविका संरक्षण अधिनियम 2014 हा केंद्र सरकारचा कायदा असून, कायद्याच्या तरतुदीनुसार पथविक्रेत्यांना व्यवसाय करण्यापासून व मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयानेदेखील राष्ट्रीय फेरीवाला धोरणाला मान्यता दिलेली आहे.
शहराच्या कापड बजार, मोची गल्ली व घास गल्ली या भागांत अतिक्रमणाच्या नावाखाली, पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावून घेण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. मागील 30 ते 40 वर्षांपासून पथविक्रेते बाजारात विविध वस्तूंचे स्टॉल्स लावतात. गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या टाळेबंदीत हातावर पोट असलेल्या पथविक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. काही दिवसांवर दिवाळी-दसरा सण आलेला आहे. पथविक्रेत्यांनी दिवाळीनिमित्त कर्ज घेऊन मोठी खरेदी केलेली आहे. महापालिका प्रशासनाने पथविक्रेत्यांवर कारवाई केल्यास, सर्व पथविक्रेते आपल्या मुला-बाळांसह उपोषणाला बसणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाला देण्यात आला.
या आंदोलनात हॉकर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष साहेबान जहागीरदार, महापालिका पथविक्रेता समिती सदस्य शाकिर शेख, संजय झिंजे, प्रकाश पोटे, सुशांत म्हस्के, भरत गारुडकर, दानिश शेख, नईम शेख, संतोष रासने आदी सहभागी झाले होते.


























































