
सामना प्रतिनिधी । मुंबई
बायोमेट्रिक हजेरी पद्धतीमधील घोळामुळे प्रत्येक महिन्यात हजारो कर्मचार्यांचा 10 ते 20 हजारांपर्यंत पगार कापला जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिका कामगार समन्वय समितीने आंदोलनाचा इशारा देत पालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर ठोस आश्वासन मिळाल्यामुळे ‘संपाचे संकट’ टळले आहे. या प्रकाराची आयुक्त प्रवीण परदेशी यांनी गंभीर दखल घेत अयोग्य पद्धतीने पगार कापल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त आणि खातेप्रमुखांचे वेतन रोखण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
पालिकेने कर्मचार्यांची बायोमेट्रिक हजेरी सुरू केल्यानंतर या पद्धतीमधील त्रुटींमुळे प्रत्येक महिन्यात कर्मचार्यांचा पगार कापला जात असल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. गेल्या महिन्यात तर तब्बल 70 हजारांवर कर्मचार्यांचा तर या महिन्यातही हजारो कर्मचार्यांचा पगार कापण्यात आला. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने सगळ्या 24 वॉर्डांमध्ये ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर समन्वय समितीने आज पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी अयोग्य पद्धतीने पगार कापलेल्या सर्व कर्मचार्यांचे पगार 10 जूनपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा करा, असे आदेश आयुक्तांनी उपआयुक्त (सामान्य प्रशासन) धामणे यांना दिले. यात हजर असूनही गैरहजेरी लागलेल्या सर्व प्रकरणांची पडताळणी करावी, असे निर्देशही आयुक्तांनी संबंधित अधिकार्यांना दिले. शिवाय 1 ऑगस्ट 2017पासून कर्मचार्यांची बंद असलेली गटविमा योजनाही लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वाहनही आयुक्तांनी समन्वय समितीला दिले. या वेळी समन्वय समितीचे बाबा कदम, ऍड. प्रकाश देवदास, महाबळ शेट्टी, सुखदेक काशीद, दिकाकर दळकी, बा.शि. साळकी, सत्यवान जावकर, सुभाष पकार, के.पी. नाईक, साईनाथ राजाध्यक्ष, सूर्यकांत पेडणेकर आणि सर्जेराव चौरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



























































