एक्सप्रेसच्या धडकेने विद्यार्थ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, बोईसर

रेल्वे क्रॉसिंग करताना एक्सप्रेसच्या धडकेने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. धावण्याचा सराव करण्यासाठी जाणाऱया तिघा विद्यार्थ्यांना दाट धुक्यामुळे समोरून येणारी एक्सप्रेस दिसली नाही. धुक्यानेच घात केला असून या दुर्घटनेमुळे बोईसर भागात हळहळ व्यक्त होत आहे.

शादावल पार्क येथे राहणारे चंदन यादव (15), कुंदन यादव (11) व मोहित गौतम (13) हे तिघेजण आज सकाळी नेहमीप्रमाणे धावण्याचा सराव करण्यासाठी घराबाहेर पडले. खैरेफाटकजवळील पुलाच्या भागात ते नेहमीच सराव करतात. दाट धुके पसरल्याने समोरील काहीच दिसत नव्हते. रेल्वे रूळ ओलांडत असतानाच भरधाव वेगात जाणाऱया हजरत मुज्जाउद्दीन एक्सप्रेसने तिघाही विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली.

एक्सप्रेसची ही धडक एवढी भीषण होती की, चंदन यादव हा नववीचा विद्यार्थी जागीच ठार झाला तर त्याचा भाऊ कुंदन यादव व मित्र मोहित गौतम हे गंभीर जखमी झाले आहेत.