मार्क कमी पडल्याने सहावीच्या विद्यार्थिनीची शाळेच्या इमारतीवरून उडी

4

सामना प्रतिनिधी । पिंपरी

मार्क कमी पडल्याने सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यात मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी त्रिवेणीनगर येथील एका शाळेत घडली.

जखमी विद्यार्थिनी त्रिवेणीनगर येथील एका शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकते. सोमवारी शाळेचा ‘ओपन डे’ होता. या दिवशी विद्यार्थी पालकांसमवेत शाळेत येतात. पालकांसमोर विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स सांगितला जातो. संबंधित मुलगीही आईसमवेत आली होती. मुलीला मागील परीक्षेत कमी मार्क मिळाल्याची माहिती शिक्षकाने सर्वांसमोर तिच्या पालकांना दिली. मार्क कमी पडले म्हणून मुलगी उदास झाली. ‘ओपन डे’चा कार्यक्रम दुपारी अडीचच्या सुमारास झाला. त्यानंतर तिची आई शाळेच्या इमारतीच्या खाली थांबली होती. याचवेळी मुलीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.