आंदोलन शिक्षकांचे, शिक्षा मात्र विद्यार्थ्यांना! बुडालेल्या अभ्यासासाठी हक्काच्या सुट्ट्यांवर गदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या आंदोलनाचा फटका या शाळांमध्ये शिकणाऱया विद्यार्थ्यांना बसत आहे. 100 टक्के अनुदान मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय या शिक्षकांनी घेतल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडत आहे. आता हा बुडालेला अभ्यास ‘कव्हर’ करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या हक्काच्या सुट्ट्यांवर गदा आणली असून गणपती, दिवाळीसारख्या दीर्घ सुट्ट्यांमध्ये तसेच जादा वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आंदोलनकर्त्या शिक्षकांनी ठरवले आहे.

5 ऑगस्टपासून राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली अनुदानाच्या मागणीसाठी राज्यभरातील शिक्षक आझाद मैदानात आंदोलन करीत आहेत. सोमवार, 26 ऑगस्टला या आंदोलनकर्त्या शिक्षकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. या लाठीमाराचा सर्व स्तरांतून तीक्र निषेध करण्यात आला.

गेल्या 19 वर्षांपासून आंदोलनाची मागणी करीत असलेल्या शिक्षकांनी आता हे आंदोलन आणखी तीक्र केले असून आजपासून राज्यातील कानाकोपऱयातील शिक्षक शाळा बंद ठेवून आझाद मैदानात आंदोलनासाठी येत आहेत. शिक्षकांची उपस्थिती आंदोलनाच्या ठिकाणी असल्याने शाळेमध्ये शिक्षकांअभावी वर्ग ओस पडले आहेत.

पालकांचा आम्हाला पाठिंबा
शाळा बंद असल्या तरी आम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. पालकांचा आमच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे, असे विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रशांत रेडीज यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा बुडालेला अभ्यास घेण्यासाठी आमची जादा वर्ग घेण्याची तयारी असून दीर्घ सुट्टय़ा कमी करून बुडालेला अभ्यासक्रम आम्ही पूर्ण करून घेऊ, असेही रेडीज म्हणाले.