
हिंदुस्थानच्या अव्वल मानांकित सुमित नागलने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरुष आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी दिली. याचबरोबर वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या सिद्धांत बांठिया व परीक्षित सोमानी या हिंदुस्थानी जोडीनेही दुसरी फेरी गाठली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत 93 व्या स्थानी असलेल्या हिंदुस्थानच्या सुमित नागलने तैपेईच्या यू सिओ सुचा 7-6(6), 6-4 असा पराभव केला. हा सामना 2 तास 6 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला सहाव्या गेमपर्यंत दोघांनी आपापल्या सर्व्हिस राखल्यामुळे सामन्यात 3-3 अशी बरोबरी निर्माण झाली. सातव्या गेममध्ये सुमितने युची सर्व्हिस ब्रेक केली व आघाडी घेतली.




























































