
सामना प्रतिनिधी, अहमदपूर
आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर तालुक्यातील सुनेगाव (शेंद्री) येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा तहसिलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सुनेगांव (शेंद्री) हे गांव लातूर लोकसभा मतदार संघामध्ये येत असून या गावातील नागरिकांना तालूक्याच्या ठिकाणी येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना 5 कि.मी. च्या अंतरासाठी 15 ते 20 कि मी अंतराचा फेरा मारावा लागत असतो. ग्रामस्थांना तालूक्याच्या ठिकाणी अनेक शासकीय कामासाठी, दवाखाना, विद्याथ्र्यांना शिक्षणासाठी जावे लागत असते. गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थांनी एस.टी. महामंडळाची गाडीही पाहिली नाही. प्रवासासाठी खाजगी वाहनाचा आधार ग्रामस्थांना घ्यावा लागतो. तसेच ग्रामस्थांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. या गावाला रस्ता देण्याच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करून विविध प्रकारे आंदोलने करूनही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. सुनेगांव (शेंद्री) हे 160 उंबऱ्याचे गाव असून गावची लोकसंख्या एकूण 1300 एवढी असून एकूण 660 एवढी मतदार संख्या आहे. याच काळामध्ये 2017 मध्ये पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर सुनेगांव (शेंद्रीच्या) ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे प्रशासनाने त्यावेळी ग्रामस्थांच्या लोकसहभागातून तात्पुरता कच्चा रस्ता बनवून दिला मात्र हा रस्ता पावसाळ्याच्या पहिल्याच पावसामध्ये वाहून गेला.
मन्याड नदीवरील अर्धवट पुलावरून विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी कसरत करावी लागत असते. या अर्धवट पुलाचे काम पूर्ण करावे तसेच पक्का रस्ता देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने तहसिलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर सरपंच नामदेव जायभाये, गोविंद काळे, सुदाम जायभाये, अंकुश थगनर, भानुदास जायभाये, बालाजी काळे, नागनाथ जायभाये, व्यंकट काटे, निवृत्ती गायकवाड, रघुनाथ जायभाये, किशन जायभाये, उध्दव काटे, यादव काटे, संभाजी थगनर, रतन जायभाये, बालाजी जायभाये यांच्यासह ग्रामस्थांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.



























































