सत्ताचोर भाजपला सर्वोच्च दणका, चंदिगडच्या महापौरपदी आपचे कुलदीप कुमार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंदिगड महापौर पदाच्या निवडणुकीत चिटिंग करून लोकशाहीची हत्या करणाऱया भाजपला सर्वोच्च न्यायालयाने आज कलम 142 अंतर्गत विशेषाधिकार वापरत दणका दिला. पीठासीन अधिकाऱयाने हेराफेरी करून भाजप उमेदवाराला विजयी घोषित करण्याचा दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने फिरवला आणि जुन्याच मतपत्रिकांच्या आधारे केलेल्या मतमोजणीअंती चंदिगड महापौरपदी आपचे कुलदीप कुमार विजयी झाल्याचे जाहीर केले. पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांनी न्यायालयात खोटे सांगितले त्यामुळे जे काही झाले त्याला तेच जबाबदार आहेत, असे सांगून त्यांनी आपची 8 मते जाणीवपूर्वक बाद ठरवल्याचा ठपकाही न्यायालयाने ठेवला. त्यांना नोटीस बजावत त्यांच्यावर कलम 340 अंतर्गत खटला भरण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

चंदिगड महापौरपदाच्या निवडणुकीत हेराफेरी करून भाजपच्या उमेदवाराला विजयी घोषित करणारे पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांना सर्वोच्च न्यायालयाने आजही धारेवर धरले. अनिल मसीह यांनी आपची 8 मते का अवैध ठरवली याबाबत न्यायालयात दिलेले निवेदन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने फेटाळून लावले. पीठासीन अधिकाऱयाने अवैध ठरवलेली 8 मते मिळून आप-काँग्रेस आघाडीच्या उमेदवाला एकूण 20 मते मिळाली होती. त्यामुळे आम्ही पीठासीन अधिकाऱयाचा निकाल रद्द करत आहोत, असे सांगत आपच्या उमेदवाला खंडपीठाने विजयी घोषित केले. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताच आपच्या नगरसेवकांनी एकच जल्लोष केला. पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांनी निवडणुकीत हेराफेरी करून चंदिगड महापौरपदी भाजपाचे मनोज सोनकर यांना विजयी घोषित केल्याचा आरोप करत आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.

काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?
पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांनी न्यायालयात सादर केलेले निवेदन धादांत खोटे आणि चुकीचे होते. त्यामुळे न्यायिक निबंधकांनी मसीह यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी. तसेच त्यांच्यावर कलम 340 अंतर्गत फौजदारी खटला सुरू करावा.
कारणे दाखवा नोटिसीला उत्तर देण्याची एक संधी अनिल मसीह यांना मिळायला हवी.
कुलदीप कुमार आणि मनोज कुमार यांच्या मतपत्रिका तपासल्यानंतर कुलदीप कुमार यांच्यासाठी 8 मतपत्रिकांवर मतदानाचे शिक्के असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
पीठासीन अधिकाऱयांनी मतपत्रिकेवर तळाला सह्या केल्याचे आणि खराब झालेल्या मतपत्रिकांवर एकेरी लाईन ओढल्याचे न्यायालयात सांगितले. मी इथे प्रश्न विचारतो की, याठिकाणी मतपत्रिका कुठे खराब झाल्याचे दिसत आहेत हे दाखवा.

पीठासीन अधिकाऱयाच्या कृतीवर तीव्र नाराजी
आपचा उमेदवार विजयी घोषित करतानाच सर्वोच्च न्यायालायने पीठासीन अधिकाऱयाच्या फसव्या आणि चुकीच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच पीठासीन अधिकाऱयाने केलेल्या कृत्याचा पुरावाच सीसीटीव्ही आणि मतपत्रिकांच्या रूपाने समोर आल्याचे खंडपीठाने नमूद केले. अनिल मसीह यांनी निवडणूक प्रक्रियेत हेराफेरी केल्याचा ठपकाही सर्वोच्च न्यायालयाने ठेवला. मसीह यांनी हेराफेरी केली असतानाही न्यायालयाला उघड उघड खोटे सांगितले. त्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देशही दिले.

षडयंत्रामागचा चेहरा मोदी
लोकशाहीची हत्या करण्याच्या षडयंत्रात मसिहहा फक्त मोहरा आहे. तर या षडयंत्रामागचा चेहरा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’द्वारे केली आहे.

मोदी-शाह यांच्या कटकारस्थानाचा नमुना
सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही वाचवली आहे. चंदिगड महापौर निवडणूक हा मोदी आणि शाह यांच्या लोकशाहीला मूठमाती देण्याच्या कुटील कारस्थानाचा एक छोटा नमुना आहे. अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

भाजपाच्या गुंडागर्दीला उत्तर मिळाले
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे भाजपकडून खुलेआम होणाऱया गुंडागर्दीला सडेतोड उत्तर असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक्सवरून म्हटले आहे. शेवटी सत्याचाच विजय झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

कठीण काळात लोकशाही वाचवली, थँक यू सुप्रीम कोर्ट
कठीण काळात लोकशाही वाचविल्याबद्दल थँक यू सुप्रीम कोर्ट! हा निर्णय ऐतिहासिक असून, इंडिया आघाडीचा मोठा विजय आहे. इंडिया आघाडीने एकसंधपणे काम केल्यास भाजपचा पराभव अटळ आहे, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.