महाविकास आघाडीचे जागावाटप आठवडाभरात जाहीर होणार – सुप्रिया सुळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणी किती जागा लढवायच्या याचा फॉर्म्युला ठरला असून केवळ त्यावर शिक्कामोर्तब व्हायचे बाकी आहे. येत्या आठवडाभरात त्यावर निर्णय होईल आणि जागावाटप जाहीर केले जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

सुप्रिया सुळे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत आघाडीतील सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. त्या वेळी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आणि त्यावर अनौपचारिक शिक्कामोर्तबही झाले, असे सुप्रिया सुळे यांनी या वेळी सांगितले. संविधानाच्या रक्षणासाठी आणि देशाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे त्या म्हणाल्या. संविधानाप्रमाणे निवडणुका व्हाव्यात आणि त्या पारदर्शकपणे पार पडाव्यात असे 2024 या वर्षात अपेक्षित असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.

सत्ताधाऱयांकडे 200 आमदार असूनही विकास दर मंदावला
सत्ताधाऱयांकडे 200 आमदार असूनही राज्यातील विकासाचा दर कमी झाला असल्याची टीकाही सुप्रिया सुळे यांनी या वेळी केली. इतर राज्यांचा विकासाचा दर वाढला आहे. विद्यमान सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. विकासासाठी सत्तेत जातोय असे म्हणणाऱयांनी आता याकडेही लक्ष द्यावे असे त्या म्हणाल्या. महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळाच्या मुद्दय़ावरूनही सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. या दोन्ही प्रश्नांवर उपाययोजना करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे त्या म्हणाल्या.

14 जानेवारीपूर्वी जागावाटप
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 4 जानेवारीला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेत्यांची बैठक बोलावली आहे. पक्षाच्या निवडणूक जाहीरनामा समितीची बैठकही त्याच दिवशी होणार आहे. 14 जानेवारीपासून राहुल गांधी यांच्या ‘भारत न्याय यात्रे’पूर्वी जागांचे वाटप केले जाणार असल्याचे सांगितले जाते.

फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गुन्हेगारी वाढली
देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. गृहमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले असून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात जास्त निष्क्रिय गृहमंत्री आहेत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. फडणवीसांच्या काळात पोलीस दलातील अधिकाऱयांच्या सातत्याने बदल्या केल्या जात आहेत. पोलिसांना पारदर्शकपणे काम करू दिले जात नाही असा आरोप त्यांनी केला.