एमआयएम सोबत जाऊन आंबेडकरांनी राज्य घटनेचा खून केला – सुशीलकुमार शिंदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

हिंदूंच्या मंदिरांना लक्ष करुन धर्माच्या नावावर दंगे घडविणाऱ्या एमआयएम सोबत राजकीय मैत्री करुन देशाची राज्य घटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाने राज्य घटनेचा खून करण्याचा प्रय़त्न केला असल्याची जहरी टीका काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी पंढरपूर येथे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि समविचार पक्ष कार्यकर्त्याचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात निवडणूक संदर्भात मार्गदर्शन करताना शिंदे यांनी भाजप आणि बहुजन वंचित विकास आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकरांवर जोरदार हल्लाबोल केला.

शिंदे म्हणाले, सोलापुरातील भाजपचा उमेदवार धर्माच्या नावावर साधुगिरी करु लागलेत तर दुसरे उमेदवार जातीयवादी एमआयएम सारख्या पक्षाला सोबत घेवून निवडणूका लढवत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्वधर्म समभाव टिकून रहावा यासाठी सलग तीन वर्षे विविध देशांचा अभ्यास करुन राज्य घटना लिहिली त्याच डॉ. बाबासाहेबांचे नातू हे जातीच्या नावावर अहंकार माजवणाऱ्या अन्याय अत्याचार करणाऱ्या एमआयएम सारख्या कट्टर जातीयवादी पक्षाला सोबत घेऊन धर्माच्या नावावर मत मागत आहेत. धर्मावर आधारीत निवडणूक लढवायची का लोकशाहीतील राज्य घटनेला साथ द्यायची हे जनता ठरवेल, पण दुर्दैवाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातूच आता राज्यघटनेच्या मुऴावर उठले असल्याची टीका शिंदे यांनी केली.