14 लाखांची लाच; रात्री ताब्यात घेतलेले प्रांताधिकारी सकाळी घरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,भिवंडी

14 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागाने रचलेल्या जाळ्यात भिवंडी प्रांताधिकाऱ्याचा स्टेनो सापडला आहे. धक्कादायक म्हणजे मंगळवारी झालेल्या या कारवाईत एसीबीने स्टेनोसह प्रांतअधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र रात्रभराच्या चौकशीनंतर बुधवारी पहाटे स्टेनोला अटक झाली आणि प्रांतअधिकारी सकाळी घरी परतले. त्यामुळे लाच प्रकरणाच्या या कारवाईवरच संशय व्यक्त होत असून मोठा मासा  सटकला आणि छोटा म्हावरा एसीबीच्या जाळ्यात घावला अशीच चर्चा आज भिवंडीत सुरू होती.

भिवंडी तालुक्यातील अस्नोली येथील शेतजमिनीबाबतचा फेरफार रद्द करण्यासाठी प्रांतअधिकारी कार्यालयातील स्टेनो सुनील कांबळे याने फिर्यादीकडून 15 लाखांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 14 लाख देण्याचे मान्य करत फिर्यादीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेतली.  उपअधीक्षक सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रांत कार्यालयात सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारत असताना स्टेनो सुनील कांबळे याला रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर कार्यालयात उपस्थित असलेले प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर यांना पथकाने रात्रभर थांबवून स्टेनो सुनील कांबळेंसह त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशीनंतर प्रांतअधिकारी डॉ. मोहन नळदकर यांना सोडून देण्यात आले, तर स्टेनो कांबळेविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

खेळण्यातील नोटा

लाच देण्यासाठी फिर्यादीकडे 14 लाखांची रक्कम नसल्याने एसीबीच्या पथकाने चक्क खेळण्यातील नोटांचा वापर केला. खोटय़ा नोटांची सात बंडले या कारवाईसाठी वापरण्यात आली होती.