ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिकेची सुपर एट धडक

ऑस्ट्रेलियाने नामिबियाचा 9 विकेट्स आणि 86 चेंडूंनी दारुण पराभव करत आपल्या विजयाची हॅटट्रिक साजरी केली आणि ‘ब’ गटातून सुपर-एटमध्ये सर्वप्रथम धडक मारली. दुसरीकडे नेपाळ आणि श्रीलंका यांच्यातील सामना पावसात भिजल्यामुळे ‘ड’ गटातून दक्षिण आफ्रिका सुपर- एटमध्ये आपोआप पोहोचला असून दुसरा संघ बांगलादेश, नेदरलॅण्ड्स आणि नेपाळ यापैकी असेल. त्याचा फैसलाही उद्या बांगलादेश-नेदरलॅण्ड्स या लढतीत लागेल.

आज ऑस्ट्रेलियाने आपले विजयी अभियान कायम ठेवताना नामिबियाला डोकेही वर काढू दिले नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा आणि त्यातच अॅडम झम्पाच्या फिरकी माऱयापुढे नामिबियाच्या फलंदाजांनी सुरुवातीलाच शरणागती पत्करल्यामुळे त्यांचा संघ 17 व्या षटकातच बाद झाला. झम्पाने आपल्या फिरकीची कमाल आजही दाखवताना 12 धावांत 4 विकेट टिपले आणि नामिबियाचा खुर्दा पाडला. झम्पाने धडाधड चार विकेट घेत नामिबियाची 8 बाद 43 अशी दुर्दशा केली होती, मात्र त्यानंतर कर्णधार गेरहार्ड इरासमसने दहाव्या क्रमांकाच्या जॅक ब्रसेलसह 29 धावांची भागी रचून संघाला धावांची सत्तरी ओलांडून दिली. इरासमसने 43 चेंडूंत 36 धावा ठोकून नामिबियाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. स्टॉयनिसने ही जोडी पह्डली आणि अकराव्या क्रमांकाच्या बेन शिकाsंगोला बाद करून नामिबियाचा डाव संपवला.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाने विजयासाठी आवश्यक 73 धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी फार वेळ घेतला नाही. डेव्हिड वॉर्नर आणि ट्रव्हिस हेड मैदानात उतरताच नामिबियन गोलंदाजांवर तुटून पडले. वॉर्नरने 8 चेंडूंत 20 धावा केल्या आणि त्यानंतर हेडने 17 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकार खेचत नाबाद 34 धावा चोपत ऑस्ट्रेलियाला सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवरच महाविजय मिळवून दिला.

नेपाळ-श्रीलंका सामना रद्द; दक्षिण आफ्रिका सुपर एटमध्ये

नेपाळ आणि श्रीलंका यांच्यात लाऊडर हिलला असलेला सामना एकही चेंडू न टाकताच रद्द झाला. हा सामना रद्द झाल्यामुळे तीन विजयांसह ‘ड’ गटात अव्वल स्थानावर असलेला दक्षिण आफ्रिका आपोआप सुपर-एटमध्ये पोहोचला. श्रीलंकेचे आधीच दोन पराभव झाले होते आणि त्यातच आजचा सामनाही रद्द झाल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आता सुपर-एटमधील दुसऱया स्थानासाठी बांगलादेश, नेदरलॅण्ड्स आणि नेपाळ यांच्यात लढत असेल. जर नेपाळ आपले पुढील दोन्ही सामने जिंकतो तर ते सुपर-एटच्या शर्यतीत असतील. तसेच नेदरलॅण्ड्स आणि बांगलादेशचे दोन सामने शिल्लक असून उद्या गुरुवारी बांगलादेश आणि नेदरलॅण्ड्स यांच्यात होणारा सामनाच सुपर-एटच्या दुसऱया संघाचा फैसला करेल.