मुलीचा पायगुण! दुसऱ्याच दिवशी लागली लॉटरी, IPL गाजवणाऱ्याची थेट टीम इंडियात झाली निवड

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत आपल्या घातक यॉर्करने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या टी. नटराजन याला लॉटरी लागली आहे. चांगल्या कामगिरीचे फळ त्याला मिळाले असून थेट टीम इंडियात त्याची निवड झाली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होणाऱ्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याची निवड झाली आहे.

टी. नटराजन हा नुकताच बाप झाला आहे. आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना सुरू असताना त्याच्या घरी मुलीचा जन्म झाला आणि त्याचे नशीबच पालटले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड झालेल्या वरुण चक्रवर्ती याला दुखापत झाली आणि त्याच्या जागी नटराजन याची वर्णी लागली. बीसीसीआयने सोमवारी याची घोषणा केली.

नटराजनकडे पायाचा वेध घेणाऱ्या वेगवान चेंडूने फलंदाजाच्या यष्ट्या उडवण्याचे कसब ठासून भरले आहे. आयपीएल 2020 मध्ये त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सनरायझर्स हैद्राबाद संघाचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याने एकूण 64 यॉर्कर टाकले. इतर कोणत्याही वेगवान गोलंदाजापेक्षा त्याने दुप्पट यॉर्कर टाकले.

IPL 2020 – टी. नटराजन, नवा ‘यॉर्कर किंग’; बुमराह, बोल्टलाही मागे सोडले

तामिळनाडूतल्या सालेम जिल्ह्यातील चिन्नापम्पट्टी या गावचा असणाऱ्या टी. नटराजन याने बुमराह, बोल्ट यांना मागे खेचत यंदा सर्वाधिक यॉर्कर टाकले. टी. नटराजन याने आयपीएल 2020 मध्ये दमदार कामगिरी केली. 16 लढतीत त्याने 8.19 च्या इकॉनॉमी रेटने 16 बळी घेतले.

डेथ ओव्हरमध्ये त्याने टिच्चून गोलंदाजी करत 12 बळी घेतले. त्याने नुसत्या विकेट्सच नाही घेतल्या, तर फलंदाजांना जखडून ठेवत धावाही कमी दिल्या. एलिमीनेटर सामन्यात एबी. डिव्हीलिअर्स याचा त्रिफळा उडवला हा क्षण कायम क्रीडा चाहत्यांच्या लक्षात राहील.

आपली प्रतिक्रिया द्या