
ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला सेमिफायनलमधूनच गाशा गुंडाळावा लागला होता. एकाहून एक धुरंधर असतानाही टीम इंडियाला फायनल गाठता आली नाही. याचे खापर आता निवड समितीवर फुटले आहे. बीसीसीआयने संपूर्ण निवड समितीच बरखास्त केली आहे. निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांच्यासह अन्य सदस्यांना बीसीसीआयने घरी बसवले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, बीसीसीआयने टी-20 वर्ल्डकपनंतर चेतन शर्मा यांच्या नेतृत्वातील निवड समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा हे होते. तर, उत्तर विभागाचे प्रतिनिधी म्हणून हरविंदर सिंग, पूर्व विभागाचे प्रतिनिधी देवषिश मोहंती व दक्षिण विभागाचे प्रतिनिधी सुनील जोशी यांचा या निवड समितीत समावेश होता. या सर्वांना आता घरी बसवले जाणार असून आगामी काळात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयने दिली जाहिरात
वर्ल्डकपसाठी ज्या निवड समितीने संघ निवडला होता, त्याची आता हकालपट्टी करण्यात आली आहे. आता बीसीसीआय नवीन निवड समिती स्थापन करणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने जाहिरातही दिली आहे. या जाहिरातीमध्ये कोणते खेळाडू पात्र ठरू शकतात, याची यादीही त्यांनी दिली आहे.

























































