
माजी जगज्जेत्या श्रीलंका संघापुढे टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील गट साखळी लढतीत बुधवारी आयर्लंडचे आव्हान असेल. ‘अ’ गटातील या लढतीत जो संघ जिंकेल तो सुपर-12च्या दिशेने दमदार पाऊल टाकणार आहे. सलामीच्या लढतीत उभय संघांनी विजय मिळविलेला आहे. त्यामुळे मनोबल उंचावलेल्या या दोन संघांत कोण बाजी मारणार याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.
श्रीलंकेने नामीबियाचा, तर आयर्लंडने नेदरलॅण्डचा पराभव करून स्पर्धेतील आपल्या अभियानास प्रारंभ केला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी नामीबियाविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली, तर आयर्लंडने प्रत्येक स्तरावर नेदरलॅण्डपेक्षा सरस खेळ केला. कर्टिस पॅम्फरने चार चेंडूत चार बळी टिपण्याचा पराक्रम केला. आयर्लंडविरुद्धच्या लढतीत आमचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे, असे श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने सांगितले. कुसल परेरा व पथुम निसंका या सलामीच्या जोडीसह अनुभवी दिनेश चंदिमलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे यांनी नामीबियाविरुद्ध चांगली फलंदाजी केली. त्यांच्याकडूनही संघाला आशा आहेत. महेश थेकशाना व वानिंदु हसारंगा या फिरकीच्या जोडगोळीवर खऱया अर्थाने श्रीलंकेची मदार असणार आहे. लाहिरू कुमारा, चमिका करुणारत्ने व दुष्मंता चमीरा या वेगवान त्रिकुटामुळे श्रीलंकेचा संघ समतोल वाटतोय.
धक्का देण्याची क्षमता
आयर्लंड संघाने वेळोवेळी मोठमोठय़ा संघांना पराभवाची धूळ चारून स्वतःची क्षमता सिद्ध केलेली आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धही प्रत्येक आघाडय़ांवर सरस खेळ करण्यासाठी ते उत्सुक असतील. आयर्लंडने अनेक वेळा मोठय़ा संघाला पराभवाची धूळ चारून आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. त्यामुळे श्रीलंकेचा संघ आयर्लंडला कमी लेखण्याची चूक करणार नाही. मात्र श्रीलंकन फिरकी गोलंदाजीचा समर्थपणे सामना करून मोठी धावसंख्या उभारण्यात आयर्लंडला यश मिळाले, तरच त्यांना विजयाची आशा करता येईल.
नामिबियाविरुद्ध नेदरलॅण्डला पसंती
आयर्लंडकडून दारुण पराभव झालेला नेदरलॅण्डचा संघ टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या फेरीत नामिबियाविरुद्ध विजयासाठी उत्सुक असेल. आयर्लंडचा वेगवान गोलंदाज कुर्टिस वैम्परने नेदरलॅण्डच्या चार फलंदाजांना चार चेंडूंत बाद केले हेते. मात्र हा कटू भूतकाळ विसरून नेदरलॅण्डचा संघ नामिबियाविरुद्ध विजयासाठी सर्वस्व पणाला लावण्यासाठी सज्ज झालाय. अननुभवी कर्णधार गेरहार्ड इरास्मस व अनुभवी अष्टपैलू डेव्हिस वीरे यांच्यावर नामिबिया संघाची मदार असेल.
उभय संघ ः
श्रीलंका ः दासुन शनाका (कर्णधार), कुसाल जनिथ परेरा, दिनेश चंदिमल, धनंजया डिसिल्वा, पथुम निसंका, चरिथ असलंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, चमिका करुणारत्ने, वानिन्दु हसारंगा, दुष्मंत चमीरा, लाहिरू कुमारा, महेश थेकशाना, अकिला धनंजय, बिनुरा फर्नांडो.
आयर्लंड ः एंडी बालबर्नी (कर्णधार), मार्क एडेयर, कर्टिस कॅम्फर, गैरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, केविन ओब्रायन, सिमी सिंह, पॉल स्टर्लिंग लिंग, हॅरी टेक्टर, लोकर्ण टकर, जोश लिटिल, एंडी मॅकब्राइन, नील रॉक, बेन वाइट, व्रेग यंग.
आजच्या लढती (अ गट)
नामिबिया वि. नेदरलॅण्ड
अबुधाबी, दुपारी 3ः30 वाजता
श्रीलंका वि. आयर्लंड
अबुधाबी, रात्री 7ः30 वाजता



























































