शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

अवजड वाहतुकीने नेहमीच बदलापूर पाइपलाइन ते तळोजा एमआयडीसी मार्गावर वाहतूककोंडी होत असते. त्यातच खड्ड्यांमुळे या रस्त्याची भयंकर दुरवस्था झाल्याने दहा मिनिटांच्या प्रवासासाठी दीड-दीड तास खोळंबा होत असतो. मात्र आता शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे या मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात भूसंपादनानंतर रुंदीकरणही केले जाणार आहे. या 13कि.मी.च्या कामासाठी 90 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे खड्डे आणि वाहतूककोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

तळोजा एमआयडीसीत दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. त्यातच मुंबई, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ या शहरांमध्ये जाणाऱ्या खासगी गाड्यांची संख्याही तितकीच आहे. मात्र बदलापूर पाइपलाइन ते तळोजा एमआयडीसी या रस्त्याची गेल्या दोन-तीन वर्षांपासून खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली होती. त्यामुळे सकाळ व संध्याकाळ या भागात नेहमीच वाहतूककोंडी होते. याचा परिसरातील गावकऱ्यानाही जबरदस्त फटका बसत असून नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर जाणाऱ्या चाकरमान्यांना अनेकदा वाहतूककोंडीतच लटकावे लागत होते. याची दखल घेत शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएकडे पाठपुरावा करून हा रस्ता काँक्रीटीकरण करण्याची मागणी केली होती. त्याला यश आले असून लवकरच या मार्गाचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. तसेच टप्प्याटप्प्याने भूसंपादन होताच रुंदीकरणही केले जाणार आहे.

कल्याण-शीळ मार्गावरचा ताण कमी होणार
या मार्गावर प्रचंड खड्डे असल्याने नेहमीच वाहतूककोंडी होत असते. या कटकटीतून सुटण्यासाठी अनेकदा वाहनचालक कल्याण-शीळ मार्ग प्रवासासाठी पसंत करतात, परंतु हा मार्ग अरुंद असल्याने येथेही वाहतूककोंडी होते. मात्र बदलापूर-तळोजा रस्त्याच्या काँक्रीटीकरण व रुंदीकरणामुळे कल्याण-शीळ मार्गावरचा ताण कमी होणार असून अपघातांनाही आळा बसणार आहे.