कलापरंपरा; तारपा नृत्य – सुंदर दृकश्राव्य अनुभव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रतिभा वाघ

चित्रकला, नृत्यकला आणि संगीत या तिन्ही कलांचा सुंदर आविष्कार वारली जमातीमध्ये दिसून येतो. मातीच्या भिंतीवर तांदळाच्या वस्त्रगाळ केलेल्या पिठापासूनची पांढऱया रंगाची वारली चित्रं, तारपा नृत्य, संगीताने नृत्याला ताल देणारे तारपा वाद्य हे सारेच त्यांच्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत.

चंद्रप्रकाश आणि वस्तीतील झोपडय़ांतून डोकावणारा दिव्यांचा प्रकाश, त्यांच्या छोटय़ा छोटय़ा भिंतीवर पडलेल्या पुढेमागे हालचाली करणाऱया, वर्तुळाकारात तारपाच्या तालावर नृत्य करणाऱया स्त्री- पुरुषांच्या सावल्या हे दृश्य पाहायला मिळणे म्हणजे अहाहा! एक सुंदर दृकश्राव्य अनुभवच!

तारपा नृत्य हे परमेश्वराचे आभार मानण्याकरिता केलेले नृत्य असते. आागस्ट ते डिसेंबर या कालावधीत ते नृत्य सादर केले जाते. हे नृत्य करीत असताना आपल्याला अंतर्मनातून एक वेगळेच समाधान मिळते. या नृत्याला सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्य आहे. पुढील पिढीकडे पारंपरिक ज्ञान देणे आणि अनेकांनी एकत्र यावे, एक प्रकारे सामाजिक एकात्मता साधण्याचे काम तारपा नृत्याद्वारे केले जाते. पारंपरिक वेषातील हे नृत्य फारच सुंदर दिसते. पुरुष टावेल किंवा तत्सम कापड कमरेखाली गुंडाळतात व त्यावर आंब्याची पाने एकत्र गुंफून बांधली जातात. पुरुषांच्या एका पायात घुंगरू बांधलेले असतात. स्त्रिया केसात आंब्याची पाने कलात्मक पद्धतीने माळतात. तारपावादक मध्यभागी असतो. नृत्य करणाऱया जोडय़ांची साखळी त्याच्याभोवती गोलाकार नृत्य करीत असते. कधी कधी एक स्त्रियांची साखळी व एक पुरुषांची साखळी अशी रचना असते, तर कधी कधी एक स्त्री, एक पुरुष अशा जोडीची सलग साखळी असते. विशिष्ट प्रकारे हातात हात गुंफून साखळी न तोडता ते सलग 2 ते 3 तासही सलग नृत्य करतात. सर्वात पुढे जो नर्तक असतो, त्याच्या हातात एक काठी असते. तिला वरच्या बाजूस घुंगरू बसविलेले असतात. या काठीला ‘घोळकाठी’ म्हणतात. घोळकाठीचे मुख्य काम म्हणजे तारप्याच्या सुरासोबत नर्तकांना ताल देण्याचे काम करणे.

तारपा नृत्याला कापणी नृत्य (HARVEST DANCE) असेही म्हणतात. सुगीच्या हंगामात भरपूर पीक येईल, वाढत्या पिकांना चैतन्य मिळेल अशा उद्देशाने हे केले जाते. लग्न, नवजात बालकांचा जन्म, उत्सव, सण याप्रसंगीही तारपा नृत्याचे महत्त्व आहे. तारपा वादकाला नृत्य करणारे कधीही पाठ दाखवत नाहीत. घोळकाठी हातात असलेला वेगवेगळे आवाज काढूनही नृत्यातील टप्पे सूचित करीत असतो. तारपाच्या सुरांमध्ये एक विशेष शक्ती आहे. त्यामुळे मन:शांती मिळते असाही नर्तकांना अनुभव येतो. सूर बदलतो आणि त्यानुसार वेगवेगळे आकार आविष्कृत करतात आणि नृत्याची रंगत वाढत जाते. थोडे मध्यांतर घेऊन तारपा नृत्य रात्रभर करतात. हे वाद्य प्रत्येक ‘तारपकरी’ स्वत: बनवितो. प्रत्येक तारपा वैयक्तिक आणि अद्वितीय असतो. तारपकरी आणि तारपा एकरूप झाले तरच त्यातून उत्तम संगीताची निर्मिती होते. तारपातज्ञ भिकल्या लाडक्या दिंडा यांच्या भाषेत… ‘ज्याने वाजवायचे, त्यानेच करायचे.’

‘तारपा’ हे वाद्य आपल्याला नारायण देवाकडून मिळालेली देणगी आहे असे मानले जाते. ते पूर्णपणे नैसर्गिक साहित्यापासून बनविताना दोन ते पाच फूट लांबीचे असून त्याचे तीन भाग रचनेच्या दृष्टीने पडतात. पहिला भाग दुधी भोपळा. त्याच्या लांबीवर तारपा वाद्याची लांबी ठरते. ते ‘कंपित वायुस्तंभ’ या प्रकारात मोडते. गारुडय़ाच्या पुंगीसारख्या असणाऱया या वाद्याचा दुसरा भाग बांबूच्या दोन काठय़ा आणि तिसरा भाग ताडवृक्षाच्या पानाने बनविलेला भाग, ज्याला टोटेरा म्हणतात. बांबूची एक काठी एक छिद्राची असते. तिला ‘बोंबली’ तर सहा छिद्रांच्या दुसऱया काठीला ‘हेलेरी’ तर या दोन बांबूंना नर आणि मादी असेही संबोधतात. ज्यातून स्वर निघतात त्या (सनईत असलेल्या भागाप्रमाणे असणारा भाग) भागाला जिभळय़ा म्हणतात. तारपा बनविण्यासाठी पाच दिवस लागतात. बांबू हे सौभाग्याचे प्रतीक मानतात. भोपळा हा नजर लागू नये, वाईट नजरांपासून रक्षण व्हावे म्हणून वापरतात. ताडाची पाने खूप टिकाऊ असतात म्हणून त्यांचा वापर करतात. मेणाच्या (मधमाश्यांच्या पोवळय़ातून मिळणारे) साहय़ाने बांबू भोपळा हे जोडतात. भोपळा हा वेलीवरच सुकवावा लागतो. कुठूनही हवा गळती होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. उंबराच्या चिकाने ताडाची पाने चिकटवून त्याला तुतारीसारखा आकार दिला जातो. दोऱयाचा वापर हे जोडताना करतात. ‘तारपा’ वजनाने हलके असून ज्येष्ठ व्यक्ती ते वाजविते. तारपा बनविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. “आताची मुलं फक्त मोबाइलवर ‘हालो हालो’ बोलतात. त्यांना आवड नाही” याचे दु:ख ‘तारपा शिरोमणी’ ही पदवी मिळविलेले श्री. भिकल्या लाडक्या दिंडा हे तारपातज्ञ व्यक्त करतात. हे महाराष्ट्रातील पालघर जिल्हा, जव्हार तालुक्यातील वाळवंडे गावचे मूळ रहिवासी असून आता त्यांचे वय 85च्या आसपास आहे. त्यांच्या घराण्याला तारपा बनविण्याची 150 वर्षांची परंपरा आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून ते तारपा वाजविण्याची कला शिकले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे नाशनल अकादमी आाफ म्युझिक यांचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘सांस्कृतिक सेनानी सन्मान’ हे होत. ते केवळ तारपाकरी नसून तत्त्ववेत्ते आहेत. ते म्हणतात, तारपातील दोन बांबू स्त्री आणि पुरुष असून त्या दोघांच्या स्वरांमुळे संगीत निर्माण होते. ‘तारपा’ हे त्यांचे दैवत आहे. तो निर्जीव आहे, पण मी माझा श्वास त्याला दिला ते जिवंत होते. माझे व तारपाचे शरीर- आत्मा एकरूप होतात आणि या स्थितीचे वर्णन मी शब्दांत करू शकत नाही. त्यांनी तारपा वाजवायला सुरुवात केली की आजूबाजूचे लोक समजतात, काहीतरी देवकार्य आहे आणि तारपानृत्य करायला येतात. ते बायेन, नंदाबाई, गुंजाबाई अशा देवींना स्वरातून आळवतात. पीक चांगले यावे अशी प्रार्थना करतात.

तारपा वाजविणे हे जबाबदारीचे काम असून या सुगीच्या दिवसांत मन शांत ठेवावे लागते. हे वाद्य वाजविण्यासाठी श्वास पद्धतशीरपणे आणि तीन ते चार तास सातत्याने घ्यावा लागतो. त्यांच्या तारपा वादनामुळे काही लोकांच्या अंगात देवतेचा संचार होतो आणि ‘अंगात वारे येणे’ सुरू होते. तारपा ही मला माझ्या भूमीकडून मिळालेली भेट आहे हे सांगताना तरुण पिढी तारपा तयार करणे, तारपा वादन याकडे आकर्षित होत नाही. त्यामुळे ही परंपरा कशी टिकेल याची खंत तारपकरी श्री. भिकल्या लाडक्या दिंडा व्यक्त करतात!

– [email protected]
(लेखिका चित्रकर्ती, लोककला अभ्यासक व कलाशिक्षण तज्ञ आहेत)