Video – मैदानात बाचाबाची, बांगलादेश-झिम्बाब्वेचे खेळाडू एकमेकांना भिडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशचे खेळाडू मैदानावरील असभ्य वर्तनासाठी ओळखले जातात. नागीन डान्स, विचित्र हातवारे यामुळे त्यांची अनेकदा विरोधी संघाच्या खेळाडूंसोबत बाचाबाचीही होते. याचाच प्रत्यत हरारे येथे सुरू असलेल्या कसोटी लढतीत दिसून आला.

बांगलादेशचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून दोन्ही संघातील एकमेव कसोटी सामना हरारे येथे सुरू आहे. या लढतीच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा फलंदाज आणि झिम्बाब्वेचा गोलंदाज यांच्यात टशन पाहायला मिळाली. बांगलादेशचा फलंदाज तस्कीन अहमद आणि झिम्बाब्वेचा गोलंदाज ब्लेसिंग मुजराबानी हे एकमेकांशी भिडले. या दरम्यान दोघांनी एकमेकांना अपशब्दही वापरले. प्रकरण पार हाणामारीपर्यंत पोहोचले असते, परंतु दोघांनी स्वत:ला सावरले. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

बांगलादेशच्या डावातील 85 व्या षटकात हा प्रकार घडला. वेगवान गलंदाज ब्लेसिंग मुजराबानी गोलंदाजी, तर तस्कीन अहमद फलंदाजी करत होता. मुजराबानी याचा चेंडू तस्कीन याने डिफेंड केला. यानंतर त्याने मुजराबानीकडे पाहून विचित्र हातवारे आणि डान्स केला. फलंदाजाचा हा आगाऊपणा गोलंदाजाला आवडला नाही आणि मुजराबानी तस्कीनजवळ चालत गेला. तस्कीनही मागे हटला नाही आणि थेट गोलंदाजाला भिडला.

दरम्यान, पहिल्या दिवशी बॅकफूटवर गेलेला बांगलादेशचा संघ दुसऱ्या दिवशी मात्र ट्रॅकवर आला. बांगलादेशने तस्कीन अहमदच्या 75 आणि महमदुल्लाहच्या नाबाद 150 धावांच्या बळावर पहिल्या डावात 468 धावा केल्या. तस्कीन आणि महमदुल्लाह यांच्यात नवव्या विकेटसाठी विक्रमी 191 धावांची भागिदारी झाली. याला प्रत्युत्तर देताना झिम्बाब्वेने दुसऱ्या दिवसाखेर 1 बाद 114 धावा केल्या आहेत.