अरेरे…. कमकुवत दृष्टीमुळे चहामध्ये पावडर ऐवजी कीटकनाशक टाकले; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

कमकुवत दृष्टीमुळे वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. चहामध्ये चहा पावडर ऐवजी कीटकनाशक टाकल्याने विषबाधा होऊन दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रीकिशन सेन आणि कोमलबाई सेन अशी दोघांची नावे आहेत, तर मुलगा जितेंद्र उपचारानंतर बरा झाला आहे. मध्य प्रदेशमधील अशोकनगर जिल्ह्यातील मुंगावाला पोलीस स्थानक भागात ही घटना घडली.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीकिशन आणि कोमलबाई हे दाम्पत्य सकाळी नेहमीप्रमाणे उठले, मात्र ही त्यांची अखेरची सकाळ असेल असे त्यांना वाटलेही नसेल. रोजच्याप्रमाणे श्रीकिशन मंदिरात जाण्यासाठी निघाले आणि पत्नी चहा बनवायला स्वयंपाक घरात घुसली. मात्र चहा पावडर कमी पडल्याचे दिसताच दुसऱ्या खोलीत जाऊन त्यांनी ती आणली आणि चहात टाकली. मात्र दृष्टी अंधुक असल्याने आपण चहा ऐवजी कीटकनाशक आणले हे त्यांच्या लक्षात आले नाही.

पती श्रीकिशन यांना चहा देऊन कोमलबाई मुलाला उठवण्यासाठी गेल्या. चहा घेऊन श्रीकिशन सायकलवर मंदिरात जाण्यासाठी निघाले मात्र काही अंतरावर गेल्यावर चक्कर येऊन पडले. आजूबाजूचे लोक त्यांना घरी घेऊन आले.

दरम्यान, श्रीकिशन यांचा मुलगा जितेंद्र आणि कोमलबाई यांनीही घेतला. मुलाला तो कडू लागल्याने त्याने संपूर्ण पिला नाही. मात्र कोमलबाई यांनी चहा घेतल्याने त्यांनाही विषबाधा झाली. तिघांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान श्रीकिशन आणि कोमलबाई यांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या