
सामना प्रतिनिधी । मुंबई
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी सोमवार, २५ जून रोजी निवडणूक होत आहे. या दोन्ही निवडणुकांत तब्बल ५२ उमेदवार आपले भवितव्य अजमावणार असून या निवडणूक प्रचारात शिवसेनेने आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संजय मोरे, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार शिवाजी शेंडगे आणि नाशिक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे या उमेदवारांचे पारडे जड आहे.
सोमवारी होणाऱया निवडणुकीसाठी शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघात २६-२६ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात १२ उमेदवार उतरले आहेत, तर कोकण पदवीधरमध्ये १४ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघात १० उमेदवार तर नाशिक शिक्षक मतदारसंघात १६ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. शिवसेनेच्या उमेदवारांनी सोशल मीडिया, मतदारसंघात मतदारांशी संवाद साधून प्रचारात आघाडी घेतली आहे.
चुरस रंगणार
मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेकडून विलास पोतनीस हे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे ऍड. अमितकुमार मेहता, शेकापचे उमेदकार राजेंद्र कोरडे हे निवडणूक लढवत आहेत. कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांच्या विरोधात भाजपने राष्ट्रवादीतून आयात केलेले उमेदवार निरंजन डावखरे तर राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला हे निवडणूक लढवत आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघात १० उमेदवार निवडणूक लढवत असून शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्या विरोधात लोकभारतीचे कपिल पाटील, भाजप पुरस्कृत अनिल देशमुख हे निवडणूक लढवत आहेत. नाशिक किभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे यांच्या विरोधात भाजपचे अनिकेत विजय पाटील, माजी खासदार प्रताप सोनावणे आणि संदीप बेडसे यांच्यात लढत रंगणार आहे.
मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या
मुंबई पदवीधर – ७० हजार ६३६
कोकण पदवीधर – १ लाख ४ हजार २६४
मुंबई शिक्षक – १० हजार १४१
नाशिक शिक्षक – ५३ हजार ८९२



























































