शिक्षकाच्या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पुणे

श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल अर्थात ‘एसएसपीएमएस’ या शाळेतील शिक्षकाने सहावीच्या विद्यार्थ्याला चित्र काढले नाही या किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका येऊन त्याच्या शरीराचा उजवा भाग लुळा पडला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाला तातडीने निलंबित करण्यात आले.

एसएसपीएमएस या शाळेतील चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यांनी विद्यार्थ्यांना दोन चित्रे काढून आणण्यास सांगितली होती, परंतु प्रसन्न पाटील या सहावीतील विद्यार्थ्याने चित्रे काढली नव्हती. त्यामुळे चिडलेल्या संदीप गाडे या शिक्षकाने प्रसन्नला बेंचवर हात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर प्रसन्नला त्याने चेहऱयावर आणि पोटात मारहाण केली. डोके बेंचवर आपटले.

मारहाणीमुळे प्रसन्नचा चेहरा वाकडा झाला असून त्याला नीट बोलणेही अवघड झाले आहे. विद्यार्थ्याचा डावा डोळा कायमचा निकामी झाला आहे. तसेच त्याच्या डाव्या बाजूची वाढही खुंटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा गंभीर प्रकार झाला तरी शाळेने ही गोष्ट प्रसन्नच्या पालकांना कळवली नव्हती. प्रसन्न दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आपल्या घरी आला त्यावेळी त्याच्या पालकांच्या ही गोष्ट लक्षात आली. प्रसन्नला त्रास झाल्याने त्याला डॉक्टरांकडे नेले. तपासण्या केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विद्यार्थ्यानेही भीतीपोटी घरी मारहाणीबद्दल सांगितले नव्हते. हा विद्यार्थी मूळचा इंदापूर तालुक्यातील जांब गावचा आहे. गेले दोन-तीन दिवस त्याचा डोळा झोपेतही उघडा राहत होता. हसताना, बोलताना तो हात ठेवून चेहरा लपवत होता. म्हणून त्याला बारामतीत डॉक्टरांकडे नेऊन तपासण्यात आले तेव्हा त्याची एक रक्तवाहिनी दबली गेल्याने त्याला अर्धांगवायूचा झटका आल्याचे स्पष्ट झाले.

संपूर्ण प्रकरणाची चौकशी – स्मिता पाटील
पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यानंतर शिक्षक संदीप गाडे यांना निलंबित केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असे मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली आहे.

summary- teacher beaten up student causing paralysis