शिक्षक भरतीच्या उमेदवारांसमोर अडचणी, टेट परीक्षा अर्जात दुरुस्तीची संधी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षक भरतीसाठी होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता चाचणी (टेट) परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना अनेक अडचणी येत आहेत. ऑनलाइन अर्ज भरताना एडिटचा ऑप्शन नसल्याने परीक्षा अर्जात काही चूक झाल्यास दुरुस्तीची संधी उमेदवारांना मिळत नसून पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागत आहे. तसेच अर्जावर निळ्या शाईने स्वाक्षरी केल्यास संपूर्ण अर्जच बाद होत आहे. अर्ज भरताना काही चूक झाल्यास नव्याने नोंदणी करताना विद्यार्थ्यांना पुन्हा 950 रुपये शुल्क भरावे लागत आहे.

टेट परीक्षेसाठी एकदा भरलेला अर्ज दुसऱ्यांदा दुरुस्त करण्याची मुभा वेबसाईटवर नसल्याने उमेदवारांची मोठी अडचण झाली आहे. तसेच उमेदवाराने निळ्या अक्षरात स्वाक्षरी केल्यास संपूर्ण अर्ज बाद होत आहे. त्यामुळे या अर्जासोबत भरलेले शुल्कही वाया जात आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षा अर्जात ऑनलाइन दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध करून  द्यावा अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. याचा फटका ग्रामीण भागातील उमेदवारांना सोसावा लागत आहे. बहुसंख्य उमेदवार त्यांच्या मोबाईलद्वारे ऑनलाइन अर्ज भरत असून त्यामध्ये चुका होत असून जादा परीक्षा शुल्क भरावे लागत आहे.

8 फेब्रुवारीपर्यंत टेट परीक्षेच्या नोंदणीसाठीची मुदत होती. ती आता 12 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे.

नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादरीकरणासाठीही  मुदतवाढ दिली आहे. नॉन क्रिमी लेअर, महिला आरक्षण प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र उमेदवार 31 मार्चपर्यंत सादर करू शकतात.

सीटीईटीच्या उमेदवारांनादेखील टेट परीक्षेचा अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे.