
तातडीने निवडणूक कामासाठी नेमून दिलेल्या ठिकाणी हजर रहा, या शिक्षण विभागाच्या नोटिशीमुळे मुंबईतील शिक्षक त्रस्त झाले असताना आता पश्चिम मुंबईतील काही शाळांतील शिक्षकांना डिसेंबर 2024 पर्यंत निवडणूक डय़ुटी लावण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली असून वर्षभर आम्ही शाळेत जायचेच नाही का, असा सवाल केला आहे.
शिक्षण विभागाकडून एका शाळेतील निम्म्याहून अधिक शिक्षकांना निवडणूक कामांना जुंपण्यात आले आहे. त्यामुळे ऐन परीक्षा काळात विद्यार्थी शिक्षकाविना राहणार आहेत. काल मंगळवारी जारी केलेल्या नोटीसमध्ये नोटीस मिळाल्यानंतर दोन तासांत दिलेल्या निवडणूक मतदार कार्यालयात हजर राहावे अन्यथा आपल्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात असे आदेश दिले होते. त्यामुळे आज अनेक शिक्षक कारवाईच्या भीतीपोटी निवडणूक कामासाठी गेले आहेत. अनेक शाळांत शिक्षक असलेल्या संख्येनुसार सुमारे 50 ते 60 टक्के शिक्षकांना निवडणूक कामाची डय़ुटी लावली आहे. कोणत्याही प्रकारचे लेखी आदेश न देता केवळ व्हॉटस्अॅवर मुख्याध्यापकांना नोटीसा व शिक्षकांच्या नावाची एक्सेलशीट पाठवून शिक्षकांना तातडीने पाठवण्याची तंबी दिली जात असल्याची माहिती शाळांतील शिक्षकांनी दिली आहे.
वयोवृद्ध मतदार हयात असल्याची पडताळणी करा
80 वर्षे वय असलेल्या ज्येष्ठ मतदारांची यादी काही शिक्षकांना देण्यात आली आहे. हे मतदार हयात आहेत का, की स्थलांतरीत झाले आहेत याची माहिती गोळा करण्याच्या सूचना निवडणूक कार्यालयातून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक शिक्षकांना 50 जणांची नावे देऊन दिवसभरात अहवाल सादर करण्याच्याही सूचना दिल्या जात आहेत. शाळेतील परीक्षांचे नियोजन व इतर रोजची ऑनलाईन कामे करावी लागत असल्याने ही कामे सांभाळून निवडणुकीची कामे कशी करावी यावर शालेय शिक्षण विभाग काहीच बोलत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.






























































