चला, पुढच्या स्पर्धेसाठी टीम इंडिया सुपर-12 फेरीस पात्र, माजी विजेता विंडीज संघ मात्र बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियात पुढच्या वर्षी खेळवल्या जाणाऱया टी-20 विश्वचषक 2022 साठी थेट सुपर-12 क्वालिफायर्समध्ये प्रवेश करणाऱया आठ संघांची आयसीसीने घोषणा केली आहे. या आठ संघांमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया, हिंदुस्थान, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा समावेश आहे. सध्याच्या विश्वचषकात फायनल खेळणाऱया दोन संघांव्यतिरिक्त आयसीसी क्रमवारीतील सहा सर्वोत्तम संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत थेट सुपर -12 मध्ये प्रवेश मिळेल. सुपर 12 मध्ये रँकिंगनुसार क्वालिफाय करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर आहे.

दोन वेळचा टी-20 चॅम्पियन वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून पराभव केला आणि पुढील विश्वचषकातली सुपर 12 पैकी आठ संघ निश्चित झाले. या पराभवामुळे वेस्ट इंडीज क्रमवारीत दहाव्या, तर बांगलादेशचा संघ आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत इंग्लंड, पाकिस्तान, हिंदुस्थान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया टॉप सहा संघ आहेत, तर अफगाणिस्तान सातव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान शेवटचा सामना हरला तरीही ते क्रमवारीत 8व्या क्रमांकाच्या खाली जाणार नाहीत.

माजी चॅम्पियन विंडीजची हाराकिरी

पुढील वर्षी होणाऱया टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडीजचा संघ आता पहिल्या फेरीत श्रीलंका, नामिबिया आणि स्कॉटलंडच्या संघाशी खेळणार आहे. वेस्ट इंडीजच्या संघाची या विश्वचषकात कामगिरी अत्यंत खराब राहिली. वेस्ट इंडीजला पाचपैकी चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.