टीम इंडियाने जिंकला पहिला कसोटी सामना, बांगलादेशवर 188 धावांनी मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चट्टोग्राम येथे खेळवल्या गेलेल्या हिंदुस्थान विरुद्ध बांगलादेश सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या सामन्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे रविवारी हिंदुस्थानी गोलंदाजांच्या कामगिरीमुळे हिंदुस्थानला विजय मिळवता आला. हा सामना टीम इंडियाने 188 धावांनी जिंकून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.

बांगलादेशच्या दुसऱ्या डावात हिंदुस्थानकडून अक्षर पटेल, कुलदीप यादव यांनी दमदार खेळ केला. त्यांना सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. बांगलादेशचा दुसरा डाव 324 धावांवर आटोपला होता. अक्षर पटेलने तैजुल इस्लामला त्रिफळाचीत करून बांगलादेशचा डाव संपवत हिंदुस्थानने हा सामना 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.

बांगलादेशातील धावांच्या बाबतीत हिंदुस्थानचा हा सर्वात मोठा विजय आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणे आवश्यक होते आणि या विजयासह हिंदुस्थानने कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीकडे एक पाऊल टाकले आहे. आता हिंदुस्थानला उरलेल्या पाचपैकी चार कसोटी जिंकायच्या आहेत.

बांगलादेशच्या फलंदाजांनी शनिवारी अतिशय चिवट फलंदाजी केली. मात्र तरीही हिंदुस्थानने त्यांचे 6 फलंदाज बाद करण्यात यश मिळविले. यजमान बांगलादेशने दुसऱ्या डावात 102 षटकांत 6 बाद 272 धावसंख्येपर्यंत मजल मारली. त्यांना विजयासाठी अजूनही 241 धावांची गरज होती. हिंदुस्थानला विजयासाठी 4 बळी हवे होते. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ 324 धावा करू शकला आणि 188 धावांच्या फरकाने सामना गमावला.

बांगलादेशकडून झाकीर हसनने शतक, शाकिबने 84 आणि शांतोने 67 धावा केल्या. हिंदुस्थानकडून अक्षर पटेलने चार आणि कुलदीप यादवने तीन बळी घेतले.