शारजाहला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, त्रिची विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा

तांत्रिक बिघाडामुळे शारजाहला जाणारी एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान त्रिची विमानतळावरच थांबविण्यात आले. यामुळे 176 प्रवासी काही तास विमानातच अडकून पडले होते. प्रवाशांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना केली. काही तासांनी पर्यायी विमानाची सोय करत प्रवाशांना शारजाहला रवाना करण्यात आले.

तामिळनाडूतील त्रिची विमानतळावरून बुधवारी पहाटे 4.45 वाजता एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान शारजाहसाठी उड्डाण घेणार होते. मात्र तत्पूर्वीच विमानात काही तांत्रिक बिघाड आढळून आले. यामुळे विमानाचे उड्डाण थांबवण्यात आले. विमानात 176 प्रवासी होते. सुरक्षा नियमांनुसार प्रवाशांना काही वेळ विमानातच थांबण्यास सांगण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना सुखरुप विमानातून उतरवून टर्मिनलवर आणण्यात आले. दुपारी 2.30 वाजता पर्यायी विमानाने प्रवाशांना पाठवण्यात आले.