आईबाबत अश्लिल बोलायचा, फोनवर गप्पा मारायचा; तरुणाने तरुणाला ठार मारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रुममेटचे आईसोबत अफेयर असल्याच्या संशयावरून एका तरुणाने त्या रुममेटची रेल्वे ट्रॅकवर सुरा भोसकून हत्या केली व त्यानंतर त्याला ट्रेनखाली ढकलले. यात त्या रुममेटचा मृत्यू झाला आहे. कांदिवली व बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये हा प्रकार घडला आहे.

गणेश मुखिया (22) असे त्या मृत तरुणाचे नाव असून तो महिनाभारपूर्वीच बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील त्याच्या गावावरून बोरिवली येथे आला होता. गणेश त्याचा मित्र अशोक मुखिया (19) याच्यासोबत पोयसर येथील एका चाळीत राहायचा. त्यांची चाळ ही रेल्वे ट्रॅकच्या जवळ होती.

गणेश व अशोक हे दोघे एकाच गावचे होते. ते एकाच हॉटेलवर काम करायचे. ते एकमेकांच्या कुटुंबीयांनाही ओळखायचे. गणेश हा अशोकच्या आईशी फोनवर बोलायचा. तसेच तुझ्या आईचे माझ्यासोबत प्रेमसंबंध आहेत असे गणेशने अशोकला सांगितले होते. त्यावरून गणेश व अशोक यांचे वाद व्हायचे.

गुरुवारी रात्री अशोक व गणेश एकत्र दारू प्यायला बसले होते. त्यानंतर अशोकने गणेशला सांगितले की त्यांचे काही मित्र रेल्वे ट्रॅकवर बसले आहेत तिथे बोलावले आहे. तिथे गेल्यावर अशोकने गणेशच्या पोटात सुरा खुपसला. त्यानंतर त्याचा मृत्यू अपघाती असल्याचे दाखवण्यासाठी त्याने गणेशला धावत्या रेल्वे खाली ढकलले. त्यानंतर तो घऱी परतला.

रेल्वे पोलिसांना एक मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळल्याचा फोन आला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मृतदेहासोबत काही ओळख पत्र आहे का हे तपासत असताना त्यांना त्याचा फोन सापडला. त्याआधारे त्यांनी त्याच्या खोलीचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर त्याच्यासोबत राहणाऱ्या रुममेट्सची चौकशी केली असता अशोकवर पोलिसांना संशल आला. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याचा गुन्हा कबूल केला.