
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना प्रभू रामचंद्रांशी केल्यामुळे वादात सापडलेले उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांच्या नव्या वक्तव्याने पुन्हा नवी खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री रावत यांनी आजकाल महिला फाटक्या जीन्स घालून बाहेर फिरतात. हे सगळे योग्य आहे का, असा सवाल करीत हे कसले संस्कार अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
उत्तराखंडमधील बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री तिरथसिंह यांनी महिलांच्या पाश्चिमात्य वेशभूषेवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मुलांवर होणाऱ्या संस्काराला आईवडीलच जबाबदार असतात. मग प्रवासात मुलाला घेऊन फिरणारी महिला जर फाटकी जीन्स घालून प्रवास करीत असेल तर ती मुलांवर कसले संस्कार करणार, हा माझा सवाल आहे.
एनजीओ चालवणाऱ्या महिलेकडून ही अपेक्षा नव्हती
एकदा मी विमान प्रवास करीत होतो. त्यावेळी पहिले माझ्या शेजारी आपल्या छोटय़ा मुलाला घेऊन प्रवास करणारी महिला चक्क फाटकी जीन्स घालून बसली होती असे सांगून रावत म्हणाले, मी विचारले असता त्या महिलेनेही दिल्लीला जात असल्याचे सांगितले. ही महिला दिल्लीत एक एनजीओ चालवते आणि तिचे पती जेएनयूत प्राध्यापक आहेत. अशी पार्श्वभूमी असलेल्या महिलेला फाटलेली जीन्स घालून प्रवास करणे शोभत नाही. कारण ज्यांनी युवा पिढीवर संस्कार करायचे त्यांनीच अघळपघळ पाश्चात्य फॅशन करणे शोभते का, असाही सवाल मुख्यमंत्री रावत यांनी केला.































































