‘तेजस’ विमानाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, दोन वर्षांत दोन अपघातांमुळे चिंता

दुबई येथील एअर शोदरम्यान हिंदुस्थानचे ‘तेजस’ हे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान शुक्रवारी कोसळले. यात एका पायलटचा मृत्यू झाला. त्याआधी मागील वर्षीच्या मार्च महिन्यात जैसलमेर येथे तेजसला असाच अपघात झाला होता. दोन वर्षांत झालेल्या या दोन अपघातांमुळे ‘तेजस’ विमानाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हवाई दलाच्या ताफ्यातील मिग-21 हे विमान ऑक्टोबर 2025 मध्ये निवृत्त झाले. त्याची जागा ‘तेजस’ घेईल अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र दुबईतील अपघातामुळे मोदी सरकारची नाचकी झाली आहे. गेल्या 24 वर्षांपासून हवाई दलात असलेल्या ‘तेजस’च्या क्षमतेबद्दल शंका निर्माण झाली आहे. हवेच्या झोताला भेदून मुसंडी मारण्याची व शस्त्रs वाहून नेण्याची ‘तेजस’ची क्षमता मर्यादित आहे. ‘तेजस’मध्ये असलेले ‘जीई’ या कंपनीचे इंजिन अत्याधुनिक जेट विमानांतील इंजिनांच्या तुलनेत कमी शक्तिशाली आहे, अशा अनेक त्रुटी 2015च्या ‘कॅग’ अहवालातून पुढे आल्या होत्या.

अनेक बाबतीत ‘तेजस’ मागे

  • ‘तेजस’ची वजन वाहून नेण्याची क्षमता केवळ तीन टन एवढी आहे. त्या तुलनेत ‘ग्रिपेन’ आणि ‘एफ-16’ या विमानांची क्षमता अनुक्रमे 5.8 टन आणि 6.7 टन एवढी आहे.
  • हवेतल्या हवेत इंधन न भरता ‘तेजस’ केवळ 59 मिनिटे घिरटय़ा घालू शकते, तर ‘ग्रिपेन’ हे 2.49 तास आणि ‘एफ-16’ हे 2.51 तास हवेत राहू शकते.
  • ‘ग्रिपेन’चा पल्ला 520 किमी आणि ‘एफ-16’ चा पल्ला 645 किमी आहे, ‘तेजस’चा पल्ला केवळ 300 किमी आहे.
  • मोहिमेस सज्ज होण्यासाठी ‘तेजस’ला तासभर लागतो, तर ग्रिपेन व एफ-16 ला 23 ते 21 मिनिटे लागतात.

सॉफ्टवेअर बदलून क्षमता वाढत नाही!

‘तेजस एमके 1 ए’ या नव्या आवृत्तीत यातील बहुतेक त्रुटी दूर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतरही तक्रारी कायम आहेत. ‘तेजस एमके 1 ए’ हे नवे विमानही हवाई दलाच्या अपेक्षा पूर्ण करत नाही, असे वक्तव्य अलीकडेच एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी केले होते. सॉफ्टवेअर बदलून विमानाची क्षमता वाढत नाही. यात मजा नाही,’ असे ते म्हणाले होते.