तेजसाच्या खूनाचे गुढ अद्यापही कायम, लपवून ठेवलेली मोटार व मोबाईलचा तपास महत्वाचा

1784
tejasa-payal-beed-pune

शहरातील माणिकबाग परिसरात अलिशान सोसायटीत राहणाऱ्या उच्चशिक्षित तरुणी तेजसाचा गळा आवळून खून झाला आहे. याप्रकरणी तिन्हीही आरोपींनी तेजासाच्या घराला बाहेरुन कुलूप लावून मोटारीतून पळ काढल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. त्यानंतर आरोपींनी प्रवासासाठी वापरलेली मोटार कोठेतरी लपवून ठेउन दुसऱ्या मोटारीसह दुचाकीवरुन प्रवास केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. न्यायालयाने तिन्हीही आरोपींना 10 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आरोपींनी लपवून ठेवलेली मोटार आणि तेजसाच्या गायब मोबाईलचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान आहे. वस्तूंचा शोध लागल्यानंतर तेजसाचा खून नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला याबद्दल सिंहगड पोलिसांकडून तपासाला दिशा देण्याची शक्यता आहे.

तेजसा श्यामराव पायाळ (वय 29, रा. रामकृष्ण सोसायटी, माणिकबाग) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. त्यानुसार सिंहगड पोलिसांनी पीयूष नितीन संचेती (वय ३४, रा. तुळशीबागवाले कॉलनी), वसंतकुमार प्रभाकर गौडा (वय 31, रा. बंगळुरू), सोनल सुनील सदरे (वय 29, रा. आंबेगाव, मूळ- नगर) यांना अटक केली.

एमबीए झाल्यानंतर पुण्यात नोकरीच्या शोधात असताना तेजसा आणि तिची आई व दोन बहिणींसह माणिकबागेतील राधाकृष्ण सोसायटीत राहत होती. त्यानंतर काही दिवसांनी प्रवासादरम्यान तिची सोनलशी ओळख झाली. शहरात दोघीही नोकरीच्या शोधात असताना त्यांची पीयुषशी ओळख झाली . त्यानंतर तिघांमध्ये घट्ट मैत्री झाल्यामुळे त्यांनी मिळून अनेकदा हॉटेल आणि सोनलच्या घरी एकत्र पाट्र्या केल्या.

दरम्यान, 30 नोव्हेंबरला पीयूषचा मित्र वसंतकुमार लग्नसमारंभानिमित्त बंगलुरुहून पुण्यात आला होता. त्यादिवशी पार्टी करण्यासाठी पीयूष सोनल आणि वसंतकुमार तेजसाच्या घरी गेले होते. पार्टीमध्ये चौघांनीही दारू आणि हुक्क्याचे सेवन केले. त्यानंतर त्यांच्यात वादावादी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, तेजसाचा खून का करण्यात आला हे अद्यापि पोलिसांना कळू शकलेले नाही. जबाबमध्ये तिन्हीही आरोपींमध्ये विसंगती आढळून येत असल्याने पोलीस कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचले नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या