स्वयंपाकघर तेलंगणात तर बैठकीची खोली महाराष्ट्रात, या अनोख्या घराची संपूर्ण राज्यात तुफान चर्चा

अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर

जेवायला तेलंगाणात आणि बसायला महाराष्ट्रात असा अजब प्रकार महाराष्ट्रातील एका घरात सुरू आहे. अनेकांना वाटत असेल की या घरातील मंडळी कामकाजासाठी बाहेर पडत असतील आणि जेवायला चंद्रपूरला लागूनच असलेल्या तेलंगाणात जात असतील…तर तसं नाहीये. हा प्रकार जरा वेगळाच आहे. पवार कुटुंबाचं हे घर दोन राज्यात विभागलेलं आहे. या घराच्या स्वयंपाकघरात पाऊल ठेवताच तुम्ही तेलंगाणात पोहोचता आणि तुम्ही बैठकीच्या खोलीत पाय ठेवला की पुन्हा महाराष्ट्रात येता. सीमेवरच उभं असलेलं हे घर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलं आहे.

चंद्रपूर जिल्हातील जिवती तालुक्यात येणाऱ्या महाराजगुडा इथे हे घर आहे. दहा खोल्यांचा या घरात पवार कुटुंबीय वास्तव्यास आहेत. चंद्रपूर जिल्हाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील 14 गावे सीमा वादात अडकली आहेत. या गावावर तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकार अधिकार सांगतात. या गावात दोन्ही राज्यांच्या ग्रामपंचायती- अंगणवाडी- शाळा, रुग्णालये व कल्याणकारी योजना अस्तित्वात आहेत. देशामध्ये एकाच ठिकाणचे नागरिक एकाच निवडणुकीत दोनदा मतदान करतात असेही उदाहरण इथे सापडते.

तेलंगाणा-महाराष्ट्र सीमावादात अडकलेल्या गावांपैकी एक असलेल्या महाराजगुडा गावावर तेलंगणा सरकारने हक्क सांगितला होता. तेलंगणा सरकारने त्यांच्या राज्याची सीमा निर्धारित केली तेव्हा ही सीमा गावाचा मध्यभागातून गेली होती. तेलंगणा राज्याने आपली सीमा निश्चित केली असली तरी या सीमेला मान्यता नाही, असं असलं तरी या प्रकारामुळे अर्ध गाव तेलंगणात तर अर्ध गाव महाराष्ट्रात आलं. दोन राज्याच्या सीमेने केवळ गावालाच विभागले नाही तर एका घरालाही विभागले आहे. या घराच्या चार खोल्या तेलंगणात गेल्या तर चार खोल्या महाराष्ट्रात आल्या आहेत. विशेष म्हणजे याच घरातील स्वयंपाक घर तेलंगणात गेलं. मात्र बैठकीची खोली महाराष्ट्रात आली आहे.

चंदू देवसिंग पवार, उत्तम देवसिंग पवार या दोन भावंडाचे हे घर असून, या घरात दहा खोल्या आहेत. या घरात एकूण अकरा सदस्य घरात राहतात. तेलंगणाने जी सीमा निश्चित केली आहे. त्यानुसार या घराच्या चार खोल्या तेलंगणात गेल्या आहेत तर उर्वरित खोल्या महाराष्ट्रात आल्या आहे.