टेंभू सिंचन योजनेच्या पाण्यावरून राजकारण तापलं, उपोषणाला नोटंकी म्हणणाऱ्यांचा रोहित पाटलांनी घेतला समाचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांतील अनुक्रमे कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, कराड, सांगोला तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या टेंभू उपसा सिंचन योजनेमध्ये आणखी 17 गावांचा समावेश करण्याची मागणी शरद पवार गटाच्या आमदार सुमन आर.आर. पाटील यांनी केली आहे. या मागणीसाठी त्या आजपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहे. सुमन पाटील यांचा मुलगा आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील हे देखील उपोषणाला उपस्थित राहणार आहे. मात्र हे उपोषण नोटंकी असल्याची टीका विरोधकांनी केली. याचा रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.

माध्यमांशी संवाद साधताना रोहित पाटील म्हणाले की, आमदार सुमनताई यांनी टेंभू योजनेमध्ये सावळजसह तासगाव तालुक्यातील 8 गावं आणि कवठेमहांकळ तालुक्यातील 9 गावांचा सुप्रमा होता तो मंजूर करण्यात यावा यासाठी आमरण उपोषण केले आहे. जोपर्यंत आर.आर. आबा होते तोपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सावळजसह आठ गावं आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावं आबांनी टेंभू योजनेत समाविष्ट केली होती, पण द्वितीय सुप्रमा मंजूर झाला असतानाही काही गावं पाणी उपलब्ध नसल्यामुळे शिल्लक होती.

महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही जयंत पाटील यांच्याकडे याचा पाठपुरावा केला. लवादाच्या बैठकीमध्ये या भागासाठी पाणी आरक्षित करून घेतले. त्याबाबतचा प्रस्वात तयार असतानाही त्याला का वेळ लागतोय? हा सवाल आम्ही शासनाला उपोषणाच्या माध्यमातून करणार आहोत. तसेच जाणूनबुजून या भागाकडे दुर्लक्ष केलं जातंय का? स्थानिक लोकप्रतिनिधी राग व्यक्त करताहेत का? असा सवालही या भागातील नागरिकांचा आहे, असे रोहित पाटील म्हणाले.

समाजमाध्यमांवरती प्रसिद्दी वाढली म्हणून आमदार सुमन पाटील आणि त्यांचे सुपुत्र नोटंकी करताहेत असे काही बोलले. खरं तर हा पाण्याचा विषय असून यावर राजकारण करायचे नाही आणि विरोधकांवर अजिबात बोलायचं नाही हे आम्ही ठरवले होते. पण काही लोकं आबांपासून इतिहास काढू अशा वल्गना करत आहेत. मुलाचं भविष्य अंधारात जाईल म्हणून सुमन पाटील उपोषणाची नोटंकी करत आहेत असे काही लोक बोलत आहेत. पण या आर.आर. आबांच्या कुटुंबाने त्यांच्या पश्चातसुद्धा कसे काम केले हे इथल्या सर्वसामान्य नागरिकांनी बघितलेले आहे. माझे भविष्य अंधारात आहे की नाही याचा निर्णय सर्वसामान्य मतदार घेतील. 16 वर्षाचा असल्यापासून मी मतदारसंघात फिरतोय. आणि निवडणुका जवळ आहेत, त्यामुळे काम करायचे ही वृत्ती आबांच्या कुटुंबियांची नाही. ती वृत्ती कोणाची आहे हो लोकं सांगतील, असेही रोहित पाटील म्हणाले.