NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामवर तात्पुरती बंदी, NTA च्या शिफारशीच्या आधारे सरकारचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घातली आहे. अनेक टेलिग्राम ग्रुप्सवर नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप होता. यामुळे सरकारने सावधगिरी बाळगत आगामी नीट परिक्षा सुरळीत पार पडावी यासाठी एनटीएच्या शिफारशींच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. येत्या 21 जून रोजी देशभरात नीट परीक्षा पार पडणार आहे. त्यानंतर 22 जून रोजी हे निर्बंध संपतील.

माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69अ अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, हिंदुस्थानात टेलिग्रामचा वापर एका विशिष्ट आणि मर्यादित कालावधीसाठी प्रतिबंधित करण्यात येईल.

21 जून रोजी होणाऱ्या NEET (UG)-2026 परीक्षेबाबत संशयास्पद दावे, अनधिकृत मजकूर किंवा फसवणुकीच्या घटनांची तक्रार करण्यासाठी NTA ने विद्यार्थी, पालक, कोचिंग संस्था आणि सामान्य जनतेसाठी एक पोर्टल सुरू केले आहे.

परीक्षांची विश्वासार्हता, पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी, NTA ने NEET UG 2026 च्या पुनर्परीक्षेशी संबंधित बनावट संकेतस्थळे (websites), प्रश्नपत्रिका फुटल्याचे दावे आणि इतर संशयास्पद हालचालींची तक्रार करण्यासाठी हे पोर्टल उपलब्ध करून दिले आहे.