पाच वर्षांनंतर पठाणकोट पुन्हा टार्गेट; दहशतवाद्यांचा लष्कराच्या कॅम्पबाहेर ग्रेनेड हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पठाणकोट येथील लष्कराच्या कॅम्पबाहेर रविवारी रात्री दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. लग्नाच्या वरातीमधून दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी ग्रेनेड फेकल्याचा संशय आहे. हल्ला करून पसार झालेल्या दहशतवाद्यांचा सुरक्षा यंत्रणांमार्फत ड्रोनच्या सहाय्याने शोध घेतला जात आहे. तसेच संपूर्ण पंजाबमध्ये ‘हाय ऍलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

पठाणकोट जिल्हा लष्कराच्या सर्वाधिक महत्त्वपूर्ण ठिकाणांपैकी एक आहे. येथे हवाई दलाचे तळ, लष्कराचा दारूगोळ्यांचा डेपो तसेच चिलखती गाडय़ा आहेत. येथील वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे सुरक्षा यंत्रणा प्रचंड हादरून गेल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच जीरा तालुक्यातील सेखा गावात टिफीन बॉम्ब सापडला होता. याआधीही अर्धा डझनहून अधिक टिफीन बॉम्ब आणि हॅण्ड ग्रेनेड सापडले आहेत.

लष्कराच्या त्रिवेणी गेटसमोर ग्रेनेड फेकण्यात आला. हा दहशतवादी हल्लाच असल्याचा दावा पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. सुदैवाने हल्ल्यात जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी हल्ला झालेल्या ठिकाणावरून ग्रेनेडचे तुकडे जप्त केले आहेत. फरार दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अमृतसर, जालंधर, भठिंडा, गुरुदासपूर तसेच पंजाबच्या सर्व शहरांमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून संशयितांची झाडाझडती घेतली जात आहे. लष्कराच्या गेटवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे. याचदरम्यान नंबर प्लेटमध्ये फेरफार केलेली बेवारस कार सापडली आहे.

पाच वर्षांपूर्वी एअरबेसवर दहशतवादी हल्ला

पाच वर्षांपूर्वी 2 जानेवारी 2016 रोजी पठाणकोटमध्येच हवाई दलाच्या एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाला होता. लष्कराची वर्दी परिधान करून हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवरील रावी नदीमार्गे आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवला होता. हल्ल्यात 7 जवान शहीद झाले होते. दहशतवाद्यांनी काही गाडय़ा हायजॅक केल्या होत्या.