सामना ऑनलाईन । मुंबई
अंगावर रोमांच उभं करणारं टीझर, उत्सुकता वाढवणारं ट्रेलर आल्यानंतर आता तरुणांच्या धमन्यांमधलं रक्त सळसळवणारं असं ‘ठाकरे’ चित्रपटाचं म्युझिक लॉन्च होणार आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा शनिवारी 12 जानेवारी रोजी मुंबईत हॉटेल ताज लॅन्डवर पार पडणार आहे. ‘ठाकरे’चं हे म्युझिक ऐकण्यासाठी साऱ्यांचे कान आसुसलेले आहेत.
‘ठाकरे’ चित्रपटाला ताज्या दमाचे संगीतकार रोहन रोहन यांनी संगीत दिलं आहे. ‘व्हेंटिलेटर’, ‘बकेट लिस्ट’, ‘संजू’ अशा बहुचर्चित चित्रपटांना रोहन रोहन यांनी दिलेल्या संगीताची चांगली चर्चा झाली होती. ‘ठाकरे’चं संगीत मात्र या सगळ्याहून खास असणार असून तरुणांच्या हृदयाचा ठाव घेणारं असं असणार आहे. 12 जानेवारी हिंदीतील दोन आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधील गाणी ऐकायला मिळाणार आहे. हिंदीमधील गाणं प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग तर मराठीमधील गाणं प्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते यांनी गायले आहे.
या चित्रपटातील गाण्यांचे रेकॉर्डिंग अंधेरीच्या यशराज स्टुडिओत करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या रेकॉर्डिंगला हजेरी लावली होती. त्यांच्यावरही या सिनेमातील गाणी आणि संगीताने मोहिनी घातली होती. ‘ठाकरे’ हा सिनेमा गाजणार आणि घराघरात त्याचे संगीतही वाजणार असा सिनेमाच्या टीमला ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला होता. त्यावेळचा एक व्हिडीओ देखील प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र ठाकरे चित्रपटातील म्युझिकची ती केवळ एक झलक होती. या म्युझिक रेकॉर्डिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता.
संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित ‘ठाकरे’ येत्या 25 जानेवारी 2019रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहे. चित्रपटाची निर्मिती शिवसेना नेते-खासदार संजय राऊत याची असून दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केलेले आहे.




























































