लाखोंची लाच घेणाऱ्या पाटोळेंची कॅण्टीनमध्ये १७ हजारांची उधारी, ठाणे महापालिकेतील कॅण्टीनचालक टेन्शनमध्ये

बिल्डरकडून लाखो रुपयांची लाच घेणारे उपायुक्त शंकर पाटोळे यांची कॅण्टीनमध्ये अवघ्या १७ हजारांची उधारी असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे आधीच डबघाईला आलेला ठाणे पालिकेचा कॅण्टीनचालक टेन्शनमध्ये आला आहे. आता ही उधारी कशी वसूल करायची, असा प्रश्न कॅण्टीनचालकांना पडला आहे. दरम्यान, एकीकडे पाटोळेंना लवकर जामीन मिळू नये अशा ठाणेकरांच्या तीव्र भावना असल्या तरी पाटोळे कधी बाहेर येणार याकडे कॅण्टीनचालक डोळे लावून बसला आहे.

अतिक्रमण हटविण्यासाठी विकासकाकडून ५० लाखांच्या लाचेची मागणी करीत २५ लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मुंबई एसीबीने पाटोळे यांना पालिकेच्या वर्धापनदिनी अटक केली. जामीन मिळावा यासाठी पाटोळे धडपड करीत असून याप्रकरणी तब्बल तीन वेळा न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, शुक्रवारी पाटोळे यांच्या जामिनावरील सुनावणीला पुन्हा ब्रेक लागला. त्यांचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला आहे. सध्या पाटोळे हे तळोजा कारागृहात आहेत. ते कधी बाहेर येणार पालिकेचा कॅण्टीनचालक पाहत आहे. गेल्या महिनाभरापासून कॅण्टीनचे १७ हजारांचे बिल पाटोळे यांच्याकडे थकीत असल्याची व्यथा कॅण्टीन चालकाने मांडली.

कॉल रेकॉर्डिंग तपासा

पाटोळे यांचे कॉल रेकॉर्डिंग आणि व्हॉट्सअॅप कॉल डिटेल्सदेखील तपासले गेले पाहिजेत. तसेच त्यांच्या माल मत्तेची चौकशी करण्याबरोबरच पाटोळेंच्या नातेवाईकांचीदेखील ईडीमार्फत चौकशी करावी, जेणेकरून भ्रष्टाचाराच्या मार्गाने किती माया जमवली याचा हिशेब उघड होऊन पाटोळेंना अभय देणारे महापालिकेतील अधिकारी व राजकीय पुढारी यांचीही नावे समोर येतील. निलंबनाऐवजी पाटोळेंना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

पुन्हा सेवेत घेतले तर अधिकाऱ्यांना काळे फासू

उपायुक्त शंकर पाटोळेंसारख्या लाचखोर भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनाने पाठीशी घातल्यास तसेच पाटोळेंना पुन्हा सेवेत घेतले तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा ठाणे काँग्रेसने आज दिला आहे. लाचखोर पाटोळेंच्या कारनाम्यांचा पर्दाफाश सर्वप्रथम काँग्रेसनेच केला. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्यात सुरू झालेली अनधिकृत बांधकामांवरील कारवाई का थांबली? बेकायदा बांधकाम चौकशीप्रकरणी न्यायालयाने महापालिकेला विचारलेल्या १९ प्रश्नांना प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तरे देऊन पळवाटा शोधल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. यावेळी मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.