
लोकलमधील सीटच्या वादातून एका प्रवाशावर हल्ला केल्याची घटना ठाणे रेल्वे स्थानकात घडली आहे. या घटनेत भांडुप पूर्व येथील रहिवासी राजेंद्र सकपाळ (५५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या कपाळाला चार टाके पडले आहेत. सकपाळ हे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे एअरपोर्ट पथकात चालक म्हणून कार्यरत आहेत. या हल्ल्यामुळे लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राजेंद्र सकपाळ हे ठाकुर्ली येथे जाण्यासाठी भांडुप स्थानकातून अंबरनाथ लोकलमध्ये चढले. ठाणे स्थानकातून लोकल सुटल्यानंतर एका प्रवाशाने सीट सोडताच सकपाळ सीटवर बसले. त्यावेळी अनोळखी इसमाशी त्यांचा शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले, त्या अज्ञात व्यक्तीने ठोसे मारल्याने त्याच्या हातातील अंगठी सकपाळ यांच्या कपाळावर लागली. सहप्रवासी निशाद रफीक शेख यांच्या मदतीने मारहाण करणाऱ्या व्यक्तीला कळवा स्थानकात पकडण्यात आले. त्याचे नाव मोहम्मद खालिद जुबेर अहमद अन्सारी (२८) असून त्याच्याविरोधात ठाणे रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































