
भरधाव कंटनेरने दुचाकीला धडक दिल्याने तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मुंब्य्रातील गावदेवी बायपासजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही तरुण कामानिमित्त ठाण्याहून शिळफाटा येथे दुचाकीवरून चालले होते. यादरम्यान गावदेवी बायपासजवळ भरधाव कंटनेरने दुचाकीला धडक दिली. यात तीनही तरुण कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. मुंब्रा बायापासवर अपघाताच्या घटना सुरूच असतात. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.