
मोहन आझाद वर्कशॉप प्रस्तुत तसेच भरत दाभोळकर यांनी लिहिलेले व दिग्दर्शित केलेले ‘दॅट्स माय गर्ल’ या हिंदी नाटकाचा प्रयोग येत्या रविवारी १५ जुलै रोजी एनसीपीएच्या एक्सप्रिमेंटल थिएटरमध्ये सायंकाळी ६ वाजता आणि रात्री ८.३० वाजता रंगणार आहे. या नाटकात एका अशा मुलीची कथा दाखवण्यात आली आहे जिला बॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून करीयर करायचंय. तिच्या वडिलांनी तिला व तिच्या आईला २० वर्षांपूर्वी सोडून दिले आहे. नटी होण्यासाठी प्रयत्न करणारी ही मुलगी आणि तिचे वडील, जे कधीकाळी लेखक होते, त्यांच्यातील संवाद भन्नाटच झाला आहे.
वास्तविक ही कथा गंभीर आणि चटका लावणारी आहे, पण ती विनोदी पद्धतीने साकारण्यात आल्याने हे नाटक वेगळाच फिल निर्माण करते. आजकालची महत्त्वाकांक्षी तरुण पिढी आणि त्यांच्याशी बोलण्यात, स्पर्धा करण्यात मागे पडणारी मागची पिढी यांच्यातली दरी या नाटकातून स्पष्ट दिसते. यात अनंत महादेवन यांनी अफलातून वडील साकारला आहे, तर यात श्वेता रोहिरा आणि अनन्या दत्ता यांच्याही भूमिका पाहायला मिळतील. मोहन आझाद यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे, तर संगीत अंकित सेठ यांनी दिलंय.




























































