नांदेडमधील दोन गावांच्या दरम्यानचा पूल ढासळल्याने संपर्क तुटला

सामना प्रतिनिधी । नरसीफाटा

रविवारी रात्री मुसळधार पावसाने नायगांव तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. या तुफानी पावसात बरबडा ते वजीरगांव दरम्यान असलेला पूल ढासळल्याने दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. दरम्यान बरबडा मार्ग वजीरगांव, टाकळी, मारतळाकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

प्रशासनाच्या आकडेवारीनुसार नायगांव, बरबडा, मांजरम, कुंटूर व नरसी या चारही महसुली मंडळात रविवारी रात्री प्रचंड पाऊस बरसला. याच पावसात बरबडा गावानजीक असलेल्या नदीवरील वजीरगांवला जोडणारा पूल पुराच्या पाण्याने एका बाजूने पूर्णपणे तुटला. त्यामुळे बरबडा ते वजीरगांव, टाकळी, मारतळा या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

पुलाच्या अर्ध्या भागासह एका बाजूचा रस्ताच वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शिवारात जाणे देखील अवघड बनले असून या मार्गावरून असलेली रहदारी लक्षात घेता पडलेल्या पुलाचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे पावसाच्या तडाख्याने नायगांव ते गोळेगांव दरम्यान असलेल्या एका पुलाचा भराव वाहून गेला असून बांधकाम विभागाने तात्काळ याठिकाणी दुरुस्तीला सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले.

एकूणच रविवारी रात्रभर संततधार कोसळणाऱ्या पावसाने तालुक्यातील शेतकरी वर्गाला दिलासा दिला असला तरी पहिल्याच मुसळधार पावसात अनेक भागातील रस्त्यांची झालेली चाळण पाहता पुन्हा एकदा नायगांव तालुक्यातील सार्वजनिक कामाची गुणवत्ता व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि गुत्तेदार यांच्या कार्यपद्धतीवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या