भाजपमधील ‘त्या’ नगरसेवकांचा ‘डीएनए’ राष्ट्रवादीचाच – खासदार सुप्रिया सुळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या पाच वर्षात वातावरण वेगळे होते. आमचेच काही लोक घेऊन भाजप पुणे, पिंपरी – चिंचवड महापालिकेत सत्तेवर आले. ते स्वतःच्या कर्तृत्ववावर सत्तेत आले नव्हते. आमच्याकडील लोक घेऊन सत्तेत आले. भाजपमधील ‘त्या’नगरसेवकांचा
ओरिजनल डीएनए ‘एनसीपी’ आणि काँग्रेसचाच असल्याचे विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. आगामी महापालिका निवडणुकीत पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकर राष्ट्रवादीला मेरिटवर पास करतील, असेही त्या म्हणाल्या.

जिल्हा परिषदेच्या हिंजवडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत, गणवेश वाटप आणि शालेय साहित्याचे वाटप सोमवारी (दि. 4) खासदार सुळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक तोंडावर आली असताना राष्ट्रवादीमधील गटबाजी उफाळून आली आहे. पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार शहरात लक्ष घालणार आहेत. आपणही लक्ष घालणार का असा प्रश्न विचारला असता खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, गटबाजी सगळ्याच पक्षात असते. त्यात काही गैर नाही. त्याची एखादी मोठी बातमी झाली म्हणजे त्यात सगळे तथ्य असते असेही नाही.

गेल्या पाच वर्षांत वातावरण वेगळे होते. आमचेच काही लोक घेऊन ते सत्तेवर आले. भाजप स्वतःच्या कर्तृत्ववावर सत्तेत आला नाही. पुणे, पिंपरी-चिंचवडच्या लोकांनी पाहिले आहे, अनुभवले आहे. राष्ट्रवादीने अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे, पिंपरीतील नागरिकांची सेवा केली. पुन्हा विकासाचे ‘व्हिजन’ घेऊन आम्ही प्रांजळपणे लोकांसमोर जाणार आहोत. यावेळी पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकर राष्ट्रवादीला मेरिटवर पास करतील. तेही आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावरच असेही खासदार सुळे म्हणाल्या.